चोऱ्या-घरफोड्या झाल्या नित्याच्याच : बसस्थानकावरील प्रवासी टार्गेट, महिलांची टोळी सक्रीय लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात दररोज चोरीच्या घटना उजेडात येत असून महिनाभरात एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. बसस्थानकावर प्रवाशांचे पाकीट आणि दागिने चोरण्याच्या घटनात कमालीची वाढ झाली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या होत असल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यानंतर बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. अनेक घरांना कुलूप आहे. घरांना दोन दिवस कुलूप असले तरी चोरी झालीच म्हणून समजा. घरांसोबतच कार्यालये फोडण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. शनिवारी एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाली. एका सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. दुचाकी चोरट्यांनी तर चांगलाच उच्छाद मांडला आहे. मात्र लहान-सहान चोऱ्या होत असल्याने कुणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नाही. तसेच शहरात मोठी चोरी झाली नसल्याने पोलीसही तपासाकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु शहरातील गत महिनाभरातील चोऱ्यातील मुद्देमालाची गोळाबेरीज केली तर लाखो रुपयांच्या घरात जाते. परंतु पोलीस या चोरीच्या तपासाकडे दुर्लक्ष करीत आहे. नेमका याचाच फायदा चोरटे घेत आहे. शहरात जणू चोरट्यांना मोकळे रान असल्याचे दिसत आहे. लग्नसराईमुळे बसस्थानकावर प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत पाकीटमार सक्रिय झाले आहे. प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम पळविण्याच्या घटना गत आठ दिवसात घडल्या आहेत. विशेष म्हणजे बसस्थानकावर चोरी करण्याच्या घटनांमध्ये महिलांची टोळी सहभागी आहे. परंतु पोलिसांना या महिलांचा छडा लावण्यात अद्याप यश आले नाही. अनेकदा नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातात. परंतु तेथील अनुभव पाहता पुन्हा तक्रार करण्यास जाण्याची हिंमत होत नाही. अनेकदा फिर्यादीचीच उलट तपासणी घेतली जाते. तुमच्याच घरातील कुणी असेल असे सांगून थांबण्याचा सल्ला दिला जातो. दोन दिवस शोध घेऊन पहा नंतर तक्रार नोंदवा असे सांगितले जाते. विविध पोलीस पथके कुचकामी यवतमाळ पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा, टोळी विरोधी पथक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक, शहर, वडगाव रोड ठाण्याचे पथक आहे. दीर्घ अनुभवी कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. परंतु चोरट्यांचा सुगावा लागू नये, याचेच आश्चर्य होत आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासाठी खास मुख्यालयी परतलेल्या कर्मचाऱ्यांचेही चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे स्वत:ला पोलीस दलातील ‘क्राईम मास्टर’ म्हणविणाऱ्यांना या कर्मचाऱ्यांनाही चोरट्यांनी खुले आव्हान दिले आहे. मोबाईल चोरट्यांचे साम्राज्य यवतमाळ शहरात मोबाईल चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. बसस्थानक, आठवडीबाजार आणि दैनंदिन गर्दीच्या ठिकाणी अनेकांचे मोबाईल लंपास झाले आहे. खिशातील मोबाईल अगदी अलगदपणे उडविण्यात चोरटे माहीर आहेत. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस गेले. परंतु मोबाईल चोरटे सापडले नाही.
चोरट्यांचे यवतमाळ पोलिसांना आव्हान
By admin | Published: May 09, 2017 1:18 AM