आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक यांचे घर पत्रे लेआऊटमध्ये आहे. याच परिसरात भल्या पहाटे चोरट्यांनी डाव साधला. यापूर्वी याच लेआउटमधील ताई शिरमवार यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी याच पद्धतीने पळविली होती. पोलिसांना चकमा देणाऱ्या चोरट्यांनी शांताकला यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचा डाव पुन्हा साधला. तिघा चोरट्यांनी त्यांच्या घराची सुरुवातीला रेकी केली. दोघे जण दुचाकी घेऊन प्रा. पंचारिया यांच्या घरासमोर थांबले. एक जण चालत शांताकला यांच्या घरासमोर आला. त्याने क्षणात झटका मारून गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
झाडू घेऊन आरडाओरडा करीत शांताकला चोरट्यामागे काही अंतर धावल्या. मात्र, चोरट्यांनी धूम स्टाइलने पोबारा केला. या घटनेची वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. चोरटे इंगळे यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तसेच दोन चोरटे प्रा. केशव चेटुले यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
बॉक्स
महिलांमध्ये दहशत
यापूर्वी देवदर्शन अथवा बाजारपेठेत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचे प्रकार शहरात घडले आहेत. आता मात्र चोरट्यांनी अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलांना टार्गेट केले आहे. पोलिसांनी हे चोरटे शहराबाहेरील हिंगोली परिसरातील असावेत, अशी शंका व्यक्त केली. वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.