यवतमाळ : संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले असतानाही चोरटे बिनधास्तपणे खिडक्या तोडून आत शिरत आहे. पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये साडेतीन लाखांची रोख रक्कम आहे. ही घटना मंगळवारी रात्री २.३० वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे याच परिसरात आठ दिवसापूर्वी चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती.
सेवानिवृत्त टेलिकॉम अधिकारी अशोक मूलचंद मोटवाणी हे आपल्या पत्नी, मुलगा, सून व नातींसह राहतात. मुलगा व सून वरच्या मजल्यावर झोपतात. तळमजल्याला मोठ्या नातीसह अशोक मोटवाणी व त्यांच्या पत्नी राहतात. मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले.
पुढच्या खोलीचे ही दार बंद केले. जेणे करून कुणाला जाग आली तरी बाहेर पडता येणार नाही अशी व्यवस्था चोरट्यांनी केली. नंतर दोन कपाट फोडून त्यातील रोख दीड लाख, साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व ५० हजारांचे चांदीचे शिक्के, भांडी असा मुद्देमाल लंपास केला.
पहाटे ५ वाजता मोटवाणी यांच्या पत्नी उठल्या. त्यांना दार उघडत नव्हते. पतीला ही बाब सांगितली. त्यांनीही प्रयत्न केला. दार काही केल्या उघडत नव्हते. अखेर बेडरूम मधून बाहेरच्या बाजूने असलेला दरवाजा उघडून घराचे मुख्य दार उघडले. तरी किचनला लागलेला दरवाजा तोडून प्रवेश करावा लागला. चोरीची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली.
मोटवाणी यांच्या घरी येण्यापूर्वी चोरट्यांनी पुष्पकुंज सोसायटीतीलच रामदास राजगुरे यांच्या घराच्या खिडकीची ग्रील काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास संपूर्ण ग्रील काढून झाली असता शेजारी राहणारे प्रकाश गुल्हाने यांना जाग आली. त्यांनी आवाज दिल्याने चोरांनी तेथून पळ काढला. पुढे सत्यनारायण ले-आऊटमध्ये जिरापुरे यांच्या घरातही शिरण्याचा प्रयत्न केला. जिरापुरे यांनाही जाग आल्याने चोरटे निघून गेले. उंच बांद्याचे दोघेजण असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रकाश गुल्हाने यांनी पाहिले आहे.
लाकडी फ्रेममध्ये लावलेली ग्रील धोकादायक
जुन्या घराच्या बांधकामांमध्ये खिडक्यांच्या लाकडी फ्रेममध्ये ग्रील स्क्रूने बसविली जात होती. अशा प्रकारची ग्रील काढणे अगदीच सहज सोपे आहे. शहरातील सर्वच घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी ग्रील काढून आतमध्ये प्रवेश केला आहे. नागरिकांनी अशा ग्रील बदलवून त्या सहजासहजी निघणार नाही अशी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.