हिवरी/जवळा : आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तरोडावासी मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहेत. अखेर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व सर्व महिलांनी केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता मानकर, शाखा अभियंता सुनील राठोड, तहसीलदार गालगुंडे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड, ठाणेदार सर्जेराव गायकवाड, शाखा अभियंता कंचलवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सभापती राजू विरखेडे व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड यांनी भगवान बुटके यांच्या शेतातील बोअरवरून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तरोडा येथे सध्या संपूर्ण गावासाठी एकच हातपंप आहे. सर्व नागरिकांना याच हातपंपावरून पाणी भरावे लागते. ग्रामस्थांची संख्या लक्षात घेता आणि पाण्याची पातळी पाहता या हातपंपाचे पाणीसुद्धा गावकऱ्यांना पुरेनासे झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी ३९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या कामात गैरप्रकार झाल्याने ही योजना बंद पडली आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करून सबंधितांना शिक्षा करावी आणि गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ही योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी तरोडा येथील शेकडो महिला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना गुरुवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करावे लागते. या आंदोलनात गावातील महिला व मुलांचा सहभाग लक्षणिय होता. शासनाने तरोडावासीयांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. (वार्ताहर)
पावसाळ्यातही तरोडा तहानलेले
By admin | Published: July 11, 2014 12:25 AM