यवतमाळ : यवतमाळातील गुंतवणूकदारांंची ८७ लाखांनी फसवणूक करणाऱ्या आरोपी ठकबाज समीर जोशीसोबत चक्क एका पोलिसाने थर्टी फर्स्ट एन्जॉय केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या आरोपीला सदर पोलिसाने लॉकअपमधून बाहेर काढून आपल्या दुचाकीवर शहरभर फिरविले. त्याच्या या प्रतापाने पोलीस अधिकाऱ्यांचे मात्र सुमारे तीन-चार तास ‘ब्लडप्रेशर’ वाढविले. श्रीसूर्या इनव्हेस्टमेंट प्रकरणातील मुख्य आरोपी समीर सुधाकर जोशी (४४) रा. नागपूर, याला ८७ लाखांच्या फसवणूक प्रकरणात यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. न्यायालयातून १ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळवीली. वडगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत दहा जणांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचीच चौकशी करून आरोपी समीर जोशीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी रात्री शहर ठाण्याच्या कोठडीत बंद केले. यानंतर अधिकारी, कर्मचारी थर्टीफर्स्ट बंदोबस्त आटोपून घराकडे गेला. तितक्यात शहर ठाण्यातून फोन आला. आरोपी समीर जोशीला घेऊन गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई बाहेर गेला आहे. हा काय प्रकार आहे, म्हणून गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे बुचकळ््यात पडले. त्यांनी तातडीने शहर ठाणे गाठले. त्यांच्या पथकातील एका शिपायाने लष्करे यांच्या नावाने साना टाकून आरोपीला कोठडी बाहेर काढले. त्यामुळे लष्करे यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व अधिकारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गोळा झाले. संबंधित शिपायाच्या मोबाईलवर संपर्क होत नव्हता, त्यामुळे सर्वांनाच धडकी भरली. सर्वत्र नाकाबंदी करून शोध सुरू झाला. गुन्हे शाखेतील सर्वचजण देव पाण्यात ठेवून शिपायाचा शोध घेण्यासाठी धडपडत होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या नाट्यावर पहाटे २ वाजता पडदा पडला. संबंधित शिपायाच्या मोबाईलवर संपर्क झाला. त्याला तातडीने आरोपीस घेऊन गुन्हे शाखा कार्यालयात बोलविण्यात आले. हा महाशय आरोपीला दुचाकीवर बसवून गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. संतापलेल्या अधिकाऱ्यांनी काही एक न बोलता थेट शिपायाच्या कानशिलात लावली. आरोपीला का बाहेर काढले , अशी विचारणा करताच मद्यधुंद असलेल्या शिपायाने न्युईयर असल्याने जेवणासाठी नेल्याचे सांगितले. या उत्तराने आणखीच पारा भडकला. शेवटी त्या शिपायाचे रात्री मेडीकल करण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणती कारवाई झाली नाही. मात्र नववर्षाच्या सुरूवातीलाच अख्ख्या स्थानिक गुन्हे शाखेची शिपायाने झोप उडविली. आता जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग या प्रकरणात काय करावाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)अर्थकारणाचा संशय ४ठकबाज समीर जोशी सुमारे अडीच वर्षांपासून अटकेत आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा किंचितही लवलेश दिसत नाही. उलट आपल्याकडे आजही कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून गुंतवणूकदारांची रक्कम सुरक्षित असल्याचे व ती परत करणार असल्याचा दावा तो करतो. त्याच्या या दाव्याची सदर पोलीस शिपायाला भुरळ पडली असावी, त्याच अर्थकारणातून त्याने संगनमताने समीरला थर्टी फर्स्टसाठी लॉकअपमधून बाहेर काढले असावे असा संशय आहे. मात्र ही पार्टी सदर शिपायाच्या नोकरीवर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
कोठडीतील आरोपीचा पोलिसासोबत ‘थर्टी फर्स्ट’
By admin | Published: January 02, 2016 8:36 AM