सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोठ्या महानगरातील थर्टीफर्स्टच्या पार्टीचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. यवतमाळसारख्या शहरातही नववर्षाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र कोरोना निर्बंधामुळे मागील दोन वर्षापासून हाॅटेल व्यवसायच अडचणीत आला होता. यंदा निर्बंध शिथिल होत असताना नववर्षाचा जल्लोष घराबाहेर पडूनच साजरा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रशासनाने याबाबत कुठलेही आदेश काढलेले नाही. त्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत.नववर्षाच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा रस्त्यांवर चोख बंदोबस्त असतो. या रात्री सर्वाधिक ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातात. त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी अनेक जण संपूर्ण रात्रच बाहेर घालविण्याचे नियोजन करतात. यंदा या नियोजनाला शासनाची परवानगी राहणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तर काही जण उगाच कारवाई नको म्हणून सर्व आवश्यक मुद्देमाल घेऊन घरातच नियोजन करताना दिसत आहे.
... तर रात्रभरात २५ लाखांची उलाढाल
नववर्षाच्या जल्लोषावर अनेक जण मोकळ्या हाताने पैसा खर्च करतात. एका रात्रीतच जवळपास दीडपट धंदा होतो. सरासरी दिवसाला ५० हजार रुपये धंदा होत असेल तर नवर्षाच्या पार्टीचे आयोजन केल्याने दोन लाखांपर्यंत पैसे येतात. कोरोनामुळे हाॅटेल व्यवसाय अडचणीत होता. ती भरून काढण्याची संधी आहे.
पुढील आठवड्यात निर्णय घेणार प्रशासन - महानगरांमध्ये हाॅटेलमधील क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना एन्ट्री देण्याचे निर्बंध सध्या कायम आहेत.- याच आधारावर सुधारित निर्बंध पुढील आठवड्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नववर्ष स्वागताची पार्टी आयोजनाबाबत शासन स्तरावरून अद्याप कुठले निर्देश आलेले नाहीत. शासन स्तरावरून आलेल्या निर्देशाप्रमाणेच हाॅटेल व्यावसायिकांना नियोजन करणे बंधनकारक राहणार आहे. सुरक्षितता पाहता प्रत्येकाने नियम पाळावे.- ललितकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी
हाॅटेल चालक म्हणतात....
नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीच्या आयोजनाबाबत ग्राहकांकडून फोन येणे सुरू आहे. बुकिंगही येत आहे. मात्र अद्याप प्रशासनाचा कुठलाही आदेश मिळालेला नाही. त्यामुळे ग्राहकांचे बुकिंग घेणे थांबविलेले आहे. निर्णयानंतरच नियोजन होईल. - किशोर चाकोलेवार
सुरक्षित वातावरणात पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे काही फॅमिलींकडून यंदाही विचारणा होत आहे. हाॅटेलमध्ये पार्टी आयोजित करायची की नाही याबाबत प्रशासनाकडून निर्देश अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे द्धिधा अवस्थेत अडकलो आहे. - मिलिंद इंगळेकर
आरोग्य महत्त्वाचे, स्वागत नंतरही करता येईल
विषाणू संसर्गाचा धोका काही शहरात वाढला आहे. अशा स्थितीत आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जल्लोष काय, कधीही करता येईल. - विकास गुल्हाने
नवर्षाचे स्वागत हे कुठे जाऊन झिंगण्यापेक्षा कुटुंबातील ज्येष्ठांसोबतच राहून करणे केव्हाही चांगले आहे. नियम मोडून स्वागत करणे कुणालाही परवडणारे नाही. स्वत:ला सुरक्षित ठेवतच नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. - ललित जैन