यवतमाळ - दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली आहे.
मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता. त्यात आलेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. मात्र अमरावती विभागातील शेकडो परीक्षा केंद्रांवरील हजारो विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसोबत हे आलेख मिळालेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्नही सोडविता आलेले नाही. आता अभ्यास करूनही गुण मिळणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षक महासंघाने २६ मार्च रोजीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिवांना पत्र देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत मंडळाने मुख्य समीक्षकांच्या सभेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आलेखाबाबतचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना योग्य गुणदान करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
सर्वांनाच मिळणार पूर्ण गुण
आलेखावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य गुणदान करण्यात येईल, असे पत्र बोर्डाच्या विभागीय सचिवांनी शिक्षक महासंघाला पाठविले होते. मात्र आपण पुन्हा विभागीय सचिवांमार्फत पुण्यातील सचिवांना विनंती केली. तेव्हा, आलेखावरील प्रश्नासाठी सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जाणार असल्याचे बोर्डाने कळविल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.