यवतमाळ : भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी शनिवारी रवाना झाले. या प्रकल्पाने आजवर ३ हजार ३६६ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मराठवाड्यातील २३७ मुलं सध्या तेथे शिकत आहेत. त्यातला एकही जण घरी परत गेला नाही, हेच या प्रकल्पाच्या चांगल्या वातावरणाचे लक्षण होय. एक हजार अनाथांना या प्रकल्पात मोफत शिक्षण दिले आहे. आज ही मुले विविध पदांवर उत्तम काम करीत असल्याचे प्रकल्प शिक्षक ए. जी. पवार यांनी सांगितले. या मुलांच्या पालकांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. त्यांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची आणि शिक्षणाची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. दोन दिवसातून एकदा आम्हीच या मुलांना फोन लावून देऊ आणि त्यांच्या पालकांशी त्यांचे बोलणे करून देऊ . तसेच दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुटीसाठी या मुलांना घरी पाठविण्यात येईल. कारण चांगले शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या गावातील वातावरणाशीही जुळून राहावे, हा प्रकल्पाचा उद्देश असल्याचेही पवार म्हणाले. हा प्रकल्प भारतीय जैन संघटनेचा असल्यामुळे येथे धार्मिक शिक्षणच दिले जात असावे, अशी शंका अनेकांना वाटत असावी. मात्र मी गेल्या कित्येक वर्षापासून या प्रकल्पात काम करीत आहे. येथे केवळ मानवतावादी आणि मानवाच्या विकासासाठी आवश्यक असलेले शिक्षण दिले जाते.(स्थानिक प्रतिनिधी)
एक हजार अनाथांचे घडविले आयुष्य
By admin | Published: January 17, 2016 2:34 AM