लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात आहेत.न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर खातेदारांनी बँकेत आपल्या रकमेच्या तपासणीसाठी धाव घेतली असता, त्यांची रक्कम खात्यातून गहाळ असल्याचे आढळून आले. आतापर्यंत पोलीस दप्तरी दीड काेटी रुपये गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली. हा आकडा सतत वाढत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा घोटाळा आणखी मोठा आहे. शिष्यवृत्ती, निराधारांचे अनुदान, कर्ज वसुलीतील रक्कम याचा शोध घेण्यासाठी त्रयस्त सीएमार्फत आर्णी शाखेचे गेल्या दहा वर्षांचे लेखापरीक्षण केले जात आहे. त्यासाठी बँक पाच लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी हे करीत आहेत. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. आर्णीच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. त्यांचे जामिनाचे अर्ज प्रथम श्रेणी न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यांचा आता दारव्हा सत्र न्यायालयातून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न आहे. मंगळवारी महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके) यांच्या वतीने दारव्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, अफरातफर, विश्वासघात, अनियमितता, घोटाळ्याचा हा गुन्हा कागदोपत्री असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले आहेत. सर्वकाही कागदावर सिद्ध होत असल्याने या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही, यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी प्रयत्नरत आहेत. या घोटाळ्यातील आरोपी रोखपाल गवई याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
कुणाचे विवाह अडले तर कुणाचा उपचार रखडला आर्णी शाखेतील परस्पर रक्कम काढून घेतलेल्या बहुतांश ग्राहकांना अद्याप जिल्हा बँकेकडून रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे या ग्राहकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. कुणाच्या कुटुंबातील विवाह, कार्यप्रसंग, तर कुणाचे वैद्यकीय उपचार रखडले आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी रक्कम उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे.