उमरखेड (यवतमाळ) : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तीन शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याजवळून चितळाचे कातडे, मांस, अवयव, मुंडके व शिकारीसाठी वापरण्यात आलेले जाळे जप्त करण्यात आले.
पैनगंगा अभयारण्याच्या वडगाव नियत क्षेत्रालगत कोठारी येथील एका शाळेमागे वडगाव नियत क्षेत्रातून चितळाची अवैध शिकार करून आणल्याची गुप्त माहिती १९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खरबी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयास मिळाली होती. त्यावरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहितीची खातरजमा केली. त्याच रात्री १० वाजतापासून आरोपींच्या वराह पालन फार्महाऊसवर नजर ठेवली. तेथे रात्रभर दबा धरून सापळा लावला.
दुसऱ्या दिवशी सोमवारी २० जूनला सकाळी ७.३० वाजता आरोपी बाबू बुध्दाजी हनुमानदास याला चितळाच्या अवयवासह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून वन्यप्राणी चितळाचे अवयव, मुंडके (शिंगासह), कातडी, पाय (४) जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान या गुन्ह्यात मारोती नामदेव आरमाळकर सहभागी असल्याचे आढळले. त्याच्या घराची झडती घेतली असता शिकारीसाठी वापरण्यात आलेले ५ जाळे (वाघूर) जप्त करण्यात आले.
आणखी आरोपीच्या सहभागाची शक्यता
या गुन्ह्यात आणखी काही आरोपींच्या सहभागाची शक्यता असून त्या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारवाईची ही कामगिरी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा किरण जगताप, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) पैनगंगा अभयारण्य भारत खेलबाडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नितीन आटपाडकर, वनपाल व्ही.बी. इंगळे, वनपाल व्ही.आर. सिंगनजुडे, वनरक्षक एस.एल. कानडे, वनरक्षक ए.के. मुजमुले, वनरक्षक बी.आर. काशीदे, वनरक्षक जे.व्ही. शेंबाळे, वनरक्षक जी.एस. मुंडे, वनरक्षक पी.आर. तांबे पुढील चौकशी करीत आहे.