यवतमाळ : केळापूर तालुक्यातील करंजी येथील वाहन चालकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ७ जून रोजी घोगुलधरा फाट्यावर घडली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
करंजी येथील सलीम सुलतान गिलाणी हे आपल्या वाहनात प्रवासी घेऊन जात असताना घोगुलधरा फाट्यावर गिलाणी यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी चाकूचा धाक दाखवून २० हजार ९०० रुपये बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र अन्य तीन आरोपी फरार होते.
फरार आरोपींचा शोध घेत असताना सदर तिघे नागपूर येथून बाहेर राज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळाली. त्यावरून सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा आणि यवतमाळचे पथक नागपूरकडे रवाना झाले होते. तेथे शोध घेतला असता आरोपी रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे समजले. पथकाने तेथे जावून शुभम सुधाकर कापसे (३०) रा. जामनकरनगर यवतमाळ, विकास दिनेश खुडे (३१), सूरजनगर यवतमाळ व प्रफुल्ल नारायणराव चौकडे (३६) रा. आठवडीबाजार यवतमाळ या तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील कारही जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील चौकशीसाठी मारेगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.