यवतमाळ: तालुक्यातील वाई (मेंढी) येथील गावालगतच्या एका शेतातील उसाला अचानक आग लागली. या आगीत तीन एकरातील ऊस खाक झाला. शेतकऱ्याचे जवळपास सात लाखांचे नुकसान झाले. वाई (मेंढी) येथे गावालगत किरण आनंदराव सोळंके यांचे शेत आहे. यावर्षी त्यांनी उसाची लागवड केली आहे. ऊस आता परिपक्व झाला आहे. अशातच शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक उसाला आग लागली.
गाव जवळच असल्याने ही आग गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढली होती. मात्र आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गावालगतच्या बाजूची आग मिळेल त्या साहित्याने आटोक्यात आणली. तोपर्यंत तीन एकरातील ऊस खाक झाला होता. यात शेतकरी किरण सोळंके यांचे जवळपास सात लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.सोळंके यांच्या शेतातच वीज रोहित्र आहे. या रोहित्रात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप खरे कारण कळू शकले नाही.