राळेगावातील महिला पतसंस्था : विभागीय चौकशी संथगतीने सुरूराळेगाव : येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील सुमारे तीन हजार खातेदारांचे तीन कोटी रुपये बुडाले आहेत. या संदर्भात सुरू असलेली विभागीय चौकशी संथगतीने असल्याने दोषींवर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मार्च २०१४ मध्ये पैसे बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रथम त्यावर नागरिकांनी खासगी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर खातेधारकांनी एकत्र येऊन विविध आंदोलने केली. यानंतर शासनाद्वारे वैधानिक लेखा परिक्षणाचे आदेश देण्यात आले. हा अहवाल लेखा परिक्षक एम.जी. वानखेडे यांनी १५ सप्टेंबर १४ रोजी सहायक निबंधकाकडे सोपविला. या अहवालाची प्रत पोलिसांना सादर करण्यात आली. मध्यंतरी सदर संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलीस आणि न्यायालयीन कारवाईच्या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. आॅडिट रिपोर्ट येऊन जवळपास सव्वा वर्ष लोटले. पण या काळात सहकार विभागाने या संपूर्ण प्रकरणात दोषींना शोधून काढण्याकरिता विभागीय चौकशी सुरू केली नव्हती. आता कुठे मागील महिन्यापासून या प्रकरणात येथील सहायक निबंधक ए.एस. उल्हे यांच्याद्वारे विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. पण चौकशीची गती संथ असल्याने त्यात अनेक महिने निघून जातील, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक सहकारी संस्थेत दरमहा मिटींग घेतली जाते. यासाठीची पूर्वसूचना सहकार विभागाला नियमित देण्यात येते. सहकार विभागाचा प्रतिनिधी अशा बैठकीस उपस्थित राहणे अपेक्षित असते. मिटींगमध्ये होणारे प्रत्येक ठराव सहकार विभागाला दरवेळी पाठविले जातात. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सहकार विभागाची, आवश्यक त्या पदभरतीची मंजुरात, सहकार विभागाची परवानगी घ्यावी लागते. दरवर्षी आय-व्यय, नफातोटा पत्रक, आॅडिट रिपोर्ट, शिल्लक राशी, बँकेतील शिल्लक राशी याबाबतची माहिती सहकार विभागात सहकारी संस्थांना देणे बंधनकारक असते. तशी या संस्थेद्वारेही दिल्या गेली होती. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन ही संस्था पूर्णत: बसली. तोपर्यंत सहकार विभाग व त्या विभागाचे अधिकारी काय करीत होते, असा सवाल या प्रकरणात विचारला जात आहे. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडीत खात्यात असताना सहकार विभाग मात्र याविषयी गंभीर नाही. (तालुका प्रतिनिधी)
साडेतीन हजार ठेवीदारांचे तीन कोटी बुडीत खात्यात
By admin | Published: November 21, 2015 2:52 AM