गौळ येथे कारवाई : आरोग्य अधिकाऱ्यांनी टाकली धाड लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, आरोग्य विभागाच्या पथकाने मारलेल्या धाडीत शनिवारी तीन बोगस डॉक्टरांना तालुक्यातील गौळ येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून औषधसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईने तालुक्यात बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. कृष्णराव गोविंदराव कांबळे (७०), संजय कृष्णराव कांबळे (३०), मिलिंद कृष्णराव कांबळे (४०) सर्व रा. पोफाळी ता. उमरखेड अशी अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. पोफाळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गौळ येथे हे तिघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून शनिवारी गौळ येथे धाड मारली असता हे तिघे उपचार करताना आढळून आले. तपासणी केली असता त्यांच्याजवळ वैद्यकीय व्यवसायाचे कोणतीही पदवी आढळून आली नाही. त्यामुळे ही माहिती पोफाळी पोलिसांना देण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात औषधसाठाही जप्त करण्यात आला. पोफाळी पोलिसांनी या तिघांवर गुन्हा नोंदवून अटक केली. ही कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार, गौळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपीलकुमार बोटे यांनी केली. उमरखेड तालुक्यात मुळावा, विडूळ, सोनदाबी, कोर्टा, थेरडी व ढाणकी ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. ग्रामीण जनतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत उपचार केले जातात. उमरखेडच नव्हे तर पुसद आणि महागाव तालुक्यातही या डॉक्टरांचे जाळे आहे. गत १५ दिवसांपूर्वी पुसद तालुक्यातील बेलोरा आरोग्य केंद्रांतर्गत एका बंगाली डॉक्टरवरही कारवाई करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य वेळी उपचार मिळत नसल्याने आणि खासगी जाण्याची ऐपत नसल्याने अनेक जण या बोगस डॉक्टरांच्या आहारी जातात. गेल्या कित्येक दिवसांपासून या डॉक्टरांविरुद्ध ओळख करण्यात आली. या संदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले. आता आरोग्य विभागाने कारवाईचा सपाटा लावल्याने बोगस डॉक्टरांच धाबे दणाणले आहे. बंदी भागातील डॉक्टरांवर कारवाई केव्हा उमरखेड तालुक्यातील बंदी भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. धड रस्तेही नसलेल्या या परिसरात बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ही मंडळी रुग्णांवर उपचार करीत आहेत. अनेकदा रुग्णांना आवश्यकता नसतानाही सलाईन आणि इंजेक्शन दिले जाते. गोळ््याच्या दुष्परिणामाने अनेक जण गंभीर आजाराचा सामना करीत आहे.
तीन बोगस डॉक्टरांना अटक
By admin | Published: May 07, 2017 1:01 AM