यवतमाळ : लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय ‘स्वर जवाहर’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमोलकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी ६.३० वाजता हा महोत्सव रंगणार आहे.
शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्धी शास्त्रीय गायक कौशिकी चक्रवर्ती यांच्या ‘अनुभूती’ या फ्यूजन काॅन्सर्टने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध सिने पार्श्वगायिका साधना सरगम यांची लाइव्ह इन काॅन्सर्ट ही लोकप्रिय गाण्यावरील मैफल रंगणार आहे. तर तिसऱ्या दिवशी रविवार, १२ फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांचा ट्रॅडिशन मिट्स इनोव्हेशन हा कार्यक्रम होणार आहे.
गोधनी रोडवरील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात या महोत्सवाची जय्यत तयारी झाली असून सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या पटांगणावर पाच हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संगीत रसिकांनी या तीन दिवसीय महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.