वडिलांची तक्रार : परप्रांतात विक्रीचा संशयनेर : शहरातून तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपासून या मुली बेपत्ता असून कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. नेर येथील तीन मैत्रिणी शहरातीलच महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी शनिवारी घरुन सकाळी ११ वाजता बाहेर पडल्या. त्यानंतर त्या परत आल्याच नाही. सुरुवातीला कुटुंबियांनी उगाच चर्चा नको म्हणून या मुलींचा त्यांच्या स्तरावरच कसून शोध घेतला. मात्र या मुली कुठेच आढळल्या नाही. शेवटी नाईलाज झाल्याने व भीती पोटी मुलींच्या वडिलांनी नेर पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी ठाणेदार संजय पुज्जलवार यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक माया वैद्य या तपास करीत आहे. नेरमधून यापूर्वीसुद्धा न्यू इंग्लिश हायस्कूल येथील दोन मुलींचे अपहरण झाले होते. त्या शेगाव व नाशिक येथे आढळून आल्या होत्या. तसेच एका मुलीला राजस्थानात विकण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. पोलिसांनी तपास करून या मुलीची राजस्थानातून सुटका केली होती. सध्या पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष केंद्रीत केले असून त्या अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या दृष्टीकोणातून पोलीस पथक रवाना झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींचे अपहरण करून परराज्यात विक्री करणारी टोळीच सक्रिय आहे. महाविद्यालयीन व अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार होत आहे. अशा स्वरूपाचे गुन्हेही दाखल होत आहे. मात्र गुन्हेगार अटक होण्याची संख्या अतिशय कमी आहे. (तालुका प्रतिनिधी)
नेर येथून तीन मुलींचे अपहरण
By admin | Published: February 07, 2017 1:18 AM