येथील सुवर्णा रवींद्र दुधे यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. इतर खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद करून चोरटे सुवर्णा दुधे व मुलगी झोपलेल्या खोलीत शिरले. आवाजाने त्या जाग्या झाल्या. त्यावेळी त्यांना चाकू लावून कपाटाची किल्ली मागितली. किल्ली भावाजवळ असल्याचे सांगितल्यानंतर चोरट्यांनी कपाट तोडून त्यातील १२ ग्रॅमचे २ गोफ, सहा ग्रॅमची चेन, चार ग्रामचे कानातले, तीन अंगठ्या, दोन लॉकेट व आट हजार रुपये रोख, असा जवळपास अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, अद्याप चोरट्यांचा सुगज लागला नाही. यापूर्वी बोदेगाव येथील सराफा दुकान व लोही येथे घरफोडी होऊन लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणांचा छडा लावला, अशी मागणी करण्यात येत आहे.