मुकेश इंगोले
दारव्हा : कधीकाळी चहालाही दूध न सापडणाऱ्या गावांमध्ये आता दूधाची गंगा वाहते. तालुक्यात महिन्याकाठी तब्बल तीन लाख लिटर दुधाचे उत्पन्न होते. हे केवळ डेअरीला जाणारे दूध असून, स्थानिक विक्रीमुळे आकडा वाढू शकतो. हे दूध उत्पादन बघता, तालुक्यात एकप्रकारे दुग्धक्रांती झाली, असे म्हटले जाते.
जवळपास १०० गावांतील अडीच हजार दूध उत्पादक एका खासगी कंपनीच्या डेअरीशी जोडले गेले आहे. या जोडधंद्यातून ते प्रगतीच्या प्रयत्नात आहे. दिवसेंदिवस शेती उत्पादनात होत असलेली घट व कोरोनाच्या संकटात ठप्प पडलेल्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात दुधाची कमतरता आहे. त्यामुळे अनेक शासकीय दूध डेअरी बंद पडल्या. तथापि, या ठिकाणीचे पोटेंनशियल लक्षात घेता, एका खासगी कंपनीने २००८ मध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार तालुक्यातील ६० गावांची दूध संकलन केंद्राकरिता निवड केली होती.
यानंतर बोरी येथे चिलिंग सेंटर तसेच हळूहळू गावांमध्ये दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली. केंद्रचालकाला लिटरमागे कमिशन, मानधन यांसह दूध संकलनासाठी लागणारे सोलर मशीन, वजनकाटा, फँट मशीन, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. केंद्रचालकाने आजूबाजूच्या गावात जनजागृती केली. अनेकांना प्रेरित केल्याने शेतकरी जुळले. संबंधितांचे डेअरी आणि बँकेत खाते उघडण्यात येते. दर दहा दिवसांनी खात्यात पैसे जमा होते. फॅटवर दुधाचे दर अवलंबून असतात तसेच कंपनीकडून मार्केटपेक्षा कमी भावात जनावरांना सुग्रास, चारा लागवडीकरिता बीज उपलब्ध करून दिले जाते.
तालुक्यात बोदेगाव, धामणगाव, चिखली, भुलाई, भांडेगाव, लोही, तरनोळी, तळेगाव आदी ६० गावांत आता दूध संकलन केंद्रे सुरू झाली. तेथे आजूबाजूच्या गावातील उत्पादक दूध आणतात. दिवसातून दोनदा कंपनीचे वाहन दूध नेण्याकरिता येते. दरदिवशी एकूण दहा हजार लिटर दूध गोळा होते. बोदेगाव, धामणगाव हे मोठे सेंटर असून, तेथे ५०० ते ७०० लिटर दूध गोळा होते. इतरही गावांत हळूहळू उत्पादनात वाढ होत आहे.
दुग्धव्यवसाय शेतीपूरक आहे. दुधासोबत शेतीला लागणारे शेणखतही मिळते. परंतु, ग्रामीण भागात दुधाला योग्य भाव मिळत नाही. विक्रीची खात्री नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु, आता डेअरीच्या माध्यमातून भाव, विक्रीची खात्री तसेच जनावरांच्या चाऱ्यासह अनेक सुविधा मिळत असल्याने अनेक जण या व्यवसायाकडे वळले आहेत.
बॉक्स
भुलाई येथे केंद्र मिळाल्यानंतर सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. आजूबाजूच्या गावात जाऊन डेअरीबाबत माहिती दिली. त्यानंतर अनेकांनी व्यवसाय सुरू केला. दुधाची आवक वाढली. त्यामुळे व्यावसायिकांसोबतच ६० गावांतील युवकांना रोजगार मिळाल्याचे भुलाई येथील शुभम गोरले यांनी सांगितले.
बॉक्स
अनेकांना मिळाला आर्थिक आधार
तालुक्यातील अनेक जण आता दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. काही जण आपले व्यवसाय सोडून याकडे वळताना दिसत आहेत. बोथ येथील रामकृष्ण भवाड यांनी दीड लाखांत प्रवासी ऑटोरिक्षा विकून दोन म्हशी घेतल्या. नंतर मेहनतीने दोनच्या सहा म्हशी झाल्या. उत्पन्नासोबत व्यवसायात वाढ झाली. किसन ठाकरे यांचा मुलगा पुण्यात कंपनीत नोकरीला होता. लाॅकडाऊनंतर तो गावी परतला. त्याने दोन म्हशी घेऊन व्यवसाय सुरू केला. त्यानेही चांगली प्रगती केली. नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे गावातच राहून व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला. धामणगाव येथील जगदीश जाधव यांनी शेतीपूरक धंदा म्हणून गायी, म्हशी घेऊन शेतात व्यवसाय सुरू केला आहे.