यवतमाळ : शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील गाडगेनगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरफोडी झाली. हा प्रकार रात्री ९.३० वाजता उघडकीस आला. त्यानंतर केवळ आठ तासांतच चोरीला गेलेल्या तीन लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांनी दोघांना अटक केली. शहर ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासचक्र फिरवून चांदोरेनगरातून आरोपींना सिनेस्टाईल ताब्यात घेतले. राम प्रल्हादराव अंगाईतकर (३६) रा. गाडगेबाबानगर हे आपल्या कुटुंबीयांसह आर्णी रोडवरील बालकृष्ण मंगलम् येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रात्री ८ वाजता ते घराबाहेर पडले. परत आल्यानंतर ९.३० वाजता घरातील लोखंडी कपाट फोडून मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. दीड तासाच्या कालावधीत चोरट्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. रोख १५ हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राम अंगाईतकर यांनी शहर ठाण्यात रात्री १० वाजता तक्रार नोंदविली. त्यानंतर ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाने तपास देण्यात आला. शोधपथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, दिनकर राठोड, महेश मांगूळकर, विनोद राठोड यांनी रेकॉर्डवर असलेल्या चोरट्यांची लोकेशन काढणे सुरु केले. त्यांना वाघापूर नाका परिसरात राहणाऱ्या सराईत चोरटा पवन रवी पाईकराव याच्यावर संशय आला. त्याचा ठावठिकाणा शोधत पोलीस पथक चांदोरेनगरातील एका महिलेच्या घरी पोहोचले. या महिलेवरही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तेथूनच पवन पाईकराव व त्याच्या बांगरनगरातील अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर केवळ आठ तासांत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
तीन लाखांच्या घरफोडीचा आठ तासात छडा
By admin | Published: December 29, 2015 8:24 PM