पक्षभेद बाजूला : सोमवारी ठरणार कारखान्याचे भवितव्यउमरखेड : उमरखेड, महागाव, पुसद आणि मराठवाड्यातील हातगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेला वसंत कारखाना यावर्षी चालू करायचाच, असा निर्धार करत तीन आमदार पक्षभेद विसरून एकत्र आले आहे. पुसद येथील नाईक बंगल्यावर या आमदारांची बैठक झाली. पोफाळीच्या वसंत कारखान्याचे १० महिन्यांपासून थकीत पगार तात्काळ करा ही मागणी घेऊन गेल्या १० दिवसांपासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यात यावर्षी कधी नव्हे एवढे साखरेचे भाव पडल्यामुळे वसंत कारखान्याच्या अडचणी वाढल्या. कामगारांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद ट्रक, ट्रॅक्टर मालक, ऊस तोडणी कामगार व त्यावर अवलंबून असलेले सर्व व्यवहार हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. कारखाना संचालक मंडळ व कामगार संघटना यांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे कारखाना बंद पडू नये यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला. शनिवारी सकाळी ९ वाजतापासून नाईक यांच्या बंगल्यावर सुरू झालेली बैठक दुपारी १२ वाजतापर्यंत चालली. यात येत्या १० आॅगस्टला यवतमाळ येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्यासोबत बँक संचालक माजी मंत्री मनोहर नाईक, उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, हदगावचे आमदार नागेश पाटील आष्टीकर, वसंत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर, कारखाना वाचविण्यासाठी भूमिका घेणारे माजी नगराध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल, भीमराव चंद्रवंशी, नितीन भुतडा आदींच्या उपस्थितीत महत्त्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बैंकेने कर्जपुरवठा करून वसंत कारखान्याला जीवदान द्यावे अशी मागणी या बैठकीत रेटण्यात येणार आहे. वसंत कारखाना चालू राहिला पाहिजे यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी आपापले पक्षभेद व आपसातील मतभेद बाजूला सारून सहकार्याची भूमिका ठेवण्यासाठी मनोहर नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १० आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत काय होणार यावरच ‘वसंत’चे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे सोमवारच्या बैठकीवरच ऊस उत्पादक सभासद, कामगारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन आमदारांनी पक्षभेद विसरून कारखान्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे सभासद व कामगारांमधून स्वागत होत आहे. (शहर प्रतिनिधी)
‘वसंत’साठी तीन आमदार एकत्र
By admin | Published: August 09, 2015 12:08 AM