पुसद (यवतमाळ) : पुसद शहरात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. टोळक्यांमध्ये आपसी वाद असून यातून एकमेकांना संपविण्याचा कट रचला जातो. या आरोपींकडून थेट अग्निशस्त्राचा वापर केला जात आहे. आपल्यावर केलेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी एका युवकावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता वर्दळीच्या मुखरे चौकात गोळीबार केला. ही गोळी पायावर लागल्याने युवक थोडक्यात बचावला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
विशाल घाटे असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल व त्याच्या मित्रांनी तीन महिन्यापूर्वी गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुुलाजवळ सचिन हराळ या युवकावर गोळीबार करीत चाकूहल्ला केला होता. त्यावेळी देशीकट्टात गोळी अडकल्याने सचिनचा जीव वाचला. चाकूच्या हल्ल्यात तो जखमी झाला. यातून दुरुस्त झाल्यानंतर सचिनने हल्ल्याचा बदला घेण्याची योजना आखली. साथीदारांच्या मदतीने तो विशाल घाटेच्यावर पाळत ठेऊ लागला. संधी मिळताच मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुखरे चौकात विशाल घाटे याच्यावर तिघांनी गोळीबार केला.
झटापटीत एक गोळी विशालच्या पायातून आरपार गेली. आरडाओरडा झाल्याने तीनही आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. निशाणा चुकल्याने विशाल घाटे याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पुसद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अपरपोलीस अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप परदेशी पुसदमध्ये पोहोचले. संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.