लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे तीन प्रस्ताव मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालकामार्फत नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे (वन्यजीव) पाठविण्यात आला आहे.टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघांची संख्या आता दीड डझनावर ्नगेली. त्यामुळे पर्यटकांचा तिकडे ओढा वाढला आहे. टिपेश्वरमधील वाघ लगतच्या तोडाबा व तेलंगाणातील व्याघ्र प्रकल्पात संचार करतात. त्यांना टिपेश्वरचे क्षेत्र संचारासाठी कमी पडते. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्रीपद संजय राठोड यांच्या रुपाने यवतमाळ जिल्ह्याकडे आल्यानंतर या मागणीला आणखी वेग आला. वनमंत्र्यांनीही हा विषय प्राधान्याने हाती घेतला. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना वनभवनाला दिल्या होत्या.टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास करून तीन प्रस्ताव तयार केले. हे प्रस्ताव मंजुरीसाठी वन भवनात पाठविले गेले आहे. त्यावरील निर्णयाची प्रतीक्षा आहे.टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवायचे झाल्यास समाविष्ट गावांचे पुनर्वसन करावे लागते, त्याला गावकऱ्यांचा विरोध होतो, त्याची प्रक्रियाही लांबलचक आहे, गावठाणांमध्ये सर्व सुविधा युक्त वसाहत निर्माण करावी लागते, प्रति कुटुंब दहा लाख मदत द्यावी लागते. या अडचणी पाहता टिपेश्वरचे क्षेत्र फार न वाढविता आहे त्या स्थितीत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यावर भर राहणार आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी प्राप्त होतो, यावर जोर दिला जात आहे.हे आहेत तीन प्रस्तावटिपेश्वर व पैनगंगा अभयारण्य एकत्र करून व्याघ्र प्रकल्प बनविण्याचा प्रस्ताव आहे.टिपेश्वर अभयारण्य व बाहेरील चार ते पाच किलोमीटर क्षेत्रात ईको सेन्सीटीव्ह झोन व बफर झोन तयार करून व्याघ्र प्रकल्प निर्माण केला जावा. त्यात ६० गावे समाविष्ट होतात. मात्र ही गावे उठविण्याची गरज नाही.टिपेश्वर अभयारण्य आहे त्याच स्थितीत त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जावा.
टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 5:00 AM
टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास करून तीन प्रस्ताव तयार केले. हे प्रस्ताव मंजुरीसाठी वन भवनात पाठविले गेले आहे. त्यावरील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
ठळक मुद्देपांढरकवडा विभाग : फाईल प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात