स्थगनादेश उठला : घाटंजी, दिग्रसमध्ये तयारी यवतमाळ : जिल्ह्यातील काही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला. मात्र काही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया अडचणीत सापडली होती. आता सर्व अडसर दूर होऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यवतमाळ बाजार समितीची निवडणूक ९ आॅक्टोबरला होणार आहे. तर घाटंजी बाजार समितीची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. दिग्रसच्या बाजार समिती मतदार यादी प्रसिद्धिची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेता यावे म्हणून बाजार समितीचे संचालक मंडळ महत्त्वाचे मानले जाते. यवतमाळ बाजार समितीचा कार्यकाळ संपल्यापासून येथे प्रशासक नियुक्त होते. निवडणुकीबाबतचा स्थगनादेश हटताच आता येथे सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली. यवतमाळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १८ आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. ३ सप्टेंबरला प्राप्त अर्जांची छाननी होईल. ८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. १२ सप्टेंबरला चिन्हांचे वाटप करण्यात येईल, तर १७ सप्टेंबरला अपिल दाखल करता येणार आहे. १९ सप्टेंबरला अपिलात गेलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यांना २० सप्टेंबरला चिन्ह वाटप केले जाईल. ९ आॅक्टोबरला मतदान तर १० आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.(शहर वार्ताहर)
तीन बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 1:27 AM