नगरपरिषदेची कारवाई : करवसुलीच्या मोहिमेने व्यावसायिकांमध्ये धास्ती पुसद : थकित कर वसुलीसाठी पुसद नगरपरिषदेने धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी येथील गांधी चौकातील तीन दुकानांना सील ठोकले. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्यावतीने मालमत्ता व पाणी कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाने गांधी चौकातील असाटी किराणा स्टोअर्स, आझाद सायकल स्टोअर्स व सरताज एजन्सीला दुपारी सील ठोकले. या तीन्ही दुकानदारांकडे सुमारे अडीच लाख रुपये मालमत्ता व पाणी करापोटी थकित असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही तीन्ही दुकाने नगरपरिषदेच्याच मालिकीची आहेत. पुसद शहरातील थकबाकीदारांची यादी नगरपरिषदेने यापूर्वीच प्रसिद्ध करुन प्रत्येकाला वैयक्तिक नोटीस बजावली आहे. तसेच १४ मार्चपर्यंत थकित रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ज्यांनी रक्कम भरली नाही, त्यांच्यावर आता कारवाईचा पाश पालिकेने आवळला आहे. त्याअंतर्गत धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. ही कारवाई मुख्याधिकारी कुरवाडे, कर अधीक्षक दिलीप दीक्षित कर संग्राहक अरुण नेवासे व धमेंद्र ठाकुर यांनी केली. नागरिकांनी आपल्याकडील थकित कराचा भरणा २५ मार्चपर्यत करावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, अन्यथा अप्रीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. (प्रतिनिधी)
तीन दुकानांना ठोकले सील
By admin | Published: March 22, 2017 12:10 AM