अविनाश साबापुरे
यवतमाळ : कंत्राटी पदभरतीचा निर्णय सरकारने मागे घेतला, परंतु बाह्यस्त्रोतांद्वारे कंत्राटी भरतीची पद्धती कायम ठेवली आहे. त्यातच आता शिकाऊ कर्मचारी नेमले जात असून आरोग्य विभागात नियमित असलेली तीन हजार पदे प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून केवळ ११ महिन्यांसाठी भरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ हे पद नियमित आहे; परंतु ही ३ हजार २०३ पदे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरीही देण्यात आली. पुण्याच्या कंपनीला काम देण्यात आले; परंतु नंतर ही पदे कंत्राटी तत्त्वावर न भरता ‘शिकाऊ’ म्हणून भरण्यात आली.
‘शिकाऊ’ भरती का?
शिकाऊ उमेदवार नेमल्यास पैसा शिल्लक राहू शकतो, असा प्रस्ताव संबंधित एजन्सीने आरोग्य अभियान संचालकांना दिला..
३२०३ कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे दरवर्षी ५१.८६ कोटी खर्च होतील. मात्र, कर्मचारी शिकाऊ घेतल्यास दरवर्षी ४०.३६ कोटी खर्च होईल, असे प्रस्तावात म्हटले होते. तो मान्य करून भरती करण्यात आली.
ज्या तांत्रिक पदावर पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्याची गरज आहे, तेथे प्रशिक्षणार्थी उमेदवार कसे काम करतील? याची समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
- अशोक जयसिंगपुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना.