नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातील तीन वाघ मराठवाड्यातील किनवट परिसरात पोहोचले असून जंगलात भ्रमंती करीत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी खरबी भागात दोन तर किनवट नजीकच्या मांडवा भागात एक वाघ आढळून आला. अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाने पहिल्यांदाच पाळीव जनावरावर हल्ला केल्याची माहिती आहे. किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दिसून आला होता. जून २०१९ पासून पाच महिन्यांत या वाघाने दोन अभयारण्यातील एक हजार ३०० किलोमीटर अंतर पार केले होते. दोन राज्यातील सहा जिल्ह्यांतून शेकडो गावे ओलांडून टी-१ सी -१ ने हा प्रवास केला होता. त्यानंतर टी -३ सी-१ हा वाघसुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा औट्रम घाट अभयारण्यात गेल्या मार्चमध्ये आढळून आला होता. आजही त्याचे वास्तव्य तिथेच आहे .पांढरकवडा तालुक्याचे वैभव असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वनविभागाच्या रेकॉर्डला १८ ते १९ वाघांची नोंद असली तरी प्रत्यक्षात ३० ते ३२ वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या क्षेत्राच्या चौपट असल्याचे दिसून येते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मतानुसार, अधिवासासाठी नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. . टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त सात ते आठ वाघ संचार करू शकतात.
व्याघ्र प्रकल्पासाठी हवी एक हजार चौरस किमी जागा टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते या अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात वाघांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
वाघाच्या संख्येच्या तुलनेत अधिवास क्षेत्र कमी पडते. बछडे साधारणपणे दीड ते दोन वर्षांची झाली की, त्यांची आई त्यांना जवळ ठेवत नाही. विशेषकरून नर वाघ आपले क्षेत्र शोधण्यासाठी बाहेर पडतात. -सुभाष पुराणिक, उपवन संरक्षक (वन्यजीव), पांढरकवडा.
टिपेश्वरमधील वाघांचा इतरत्र होणारा संचार थांबवायचा असेल, तर या अभयारण्याला टायगर प्रोजेक्टचा दर्जा देणे किंवा अभयारण्याच्या सीमा वाढविणे गरजेचे आहे; अन्यथा आसपासच्या परिसरात वाघांचा उपद्रव वाढेल -प्रा. धर्मेंद्र तेलगोटे, वन्यजीव अभ्यासक