नरेश मानकर,
पांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील तीन वाघ मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात पोहोचले असून जंगलात भ्रमंती करीत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी खरबी भागात दोन तर किनवट नजीकच्या मांडवा भागात एक वाघ आढळून आला. अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाने पहिल्यांदाच पाळीव जनावरावर हल्ला केल्याची माहिती आहे.
टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना त्यांचे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे अभयारण्यातून बरेच वाघ बाहेर अधिवास क्षेत्र शोधण्यासाठी निघत आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मागील महिन्यापासून या वाघांची भ्रमंती सुरू असून वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. किनवट तालुक्यात पोहोचलेला वाघ हा तीन ते चार वर्षांचा असून नर आहे की मादी हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. खरबी परिसरात असलेल्या दोन वाघांपैकी एक वाघ नर तर एक मादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दिसून आला होता. जून २०१९ पासून पाच महिन्यांत या वाघाने दोन अभयारण्यातील एक हजार ३०० किलोमीटर अंतर पार केले होते. दोन राज्यातील सहा जिल्ह्यांतून शेकडो गावे ओलांडून टी-१ सी -१ ने हा प्रवास केला होता. त्यानंतर टी -३ सी-१ हा वाघसुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा औट्रम घाट अभयारण्यात गेल्या मार्चमध्ये आढळून आला होता. आजही त्याचे वास्तव्य तिथेच आहे .
बॉक्स :
टिपेश्वर अभयारण्यात क्षमतेच्या चौपट वाघांचे अस्तित्व
पांढरकवडा तालुक्याचे वैभव असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वनविभागाच्या रेकॉर्डला १८ ते १९ वाघांची नोंद असली तरी प्रत्यक्षात ३० ते ३२ वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या क्षेत्राच्या चौपट असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात क्षेत्र कमी आणि वाघांची संख्या जास्त अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ जंगलाबाहेर येत आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मतानुसार, अधिवासासाठी नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. त्यांच्या या संचारक्षेत्रात तो अन्य कुणाला एंट्री करू देत नाही. त्यामुळे इतर वाघ आपले क्षेत्र इतरत्र शोधतात. आपले क्षेत्र निश्चित करण्याच्या नादात हे वाघ अभयारण्याच्या बाहेर येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात वाघाला त्याचे क्षेत्र कमी पडत आहे. टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त सात ते आठ वाघ संचार करू शकतात. मात्र प्रत्यक्षात ३० ते ३२ वाघ असल्याचे सांगितले जात आहे.
बॉक्स : व्याघ्र प्रकल्पासाठी हवी एक हजार चौरस किलोमीटर जागा
टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते या अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात वाघांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे.