मारेगाव : करंजीकडून वणीकडे येणाऱ्या १६ चाकी ट्रेलरचे स्टेअरींगमध्ये बिघाड झाल्याने ट्रेलरने एकाच वेळी तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.करंजीकडून एम.एच.३१ सी.क्यू-६३४४ हा १६ चाकी ट्रक वणीकडे येत होता. मारेगावजवळ ट्रकच्या स्टेअरींगमध्ये बिघाड आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. तहसील कार्यालयासमोर असलेल्या एका दुचाकीला धडक दिल्यानंतर हा ट्रक बसस्थानक परिसरात घुसला. तेथे उभ्या असलेल्या एका आॅटोला धडक दिली व पुन्हा एका दुचाकीला धडक दिल्याने यामध्ये डॉ.देवेंद्र निर्मलकर हे गंभीर जखमी झाले. तर आॅटोमधील किशोर कांबळे हे सुद्धा जखमी झाले. तो ट्रक फुटपाथवर चढल्यामुळे थांबला. तेव्हा चालकाने ट्रकमधून पळ काढून पोलीस स्टेशन गाठले. जखमींना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळची वेळ असल्याने बस स्थानक परिसरात गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमीेवर उपचार करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने जनतेने ग्रामीण रूग्णालयावर रोष व्यक्त केला. अखील भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा ब्रिगेड, आदिवासी जनसंग्राम या संघटनांनी निषेध केला. (शहर प्रतिनिधी)
अनियंत्रित ट्रेलरची तीन वाहनांना जबर धडक
By admin | Published: November 15, 2015 1:41 AM