लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन बाळापूर (जि.हिंगोली) कडे महिंद्रा मॅक्स वाहनाने परत जात असताना जिल्ह्यातील मारेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तीन महिला ठार, तर आठजण जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.लक्ष्मीबाई भारत उपरे (५०), सारिका किसन भोपाले (१६), साक्षी देविदास उपरे (२४) अशी मृतांची नावे आहेत. यातील साक्षी उपरे हिचा पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. या अपघातात राजनंदीनी सुनील पवार (४) रा.दांडगाव जि.नांदेड, पूजा शंकर उपरे (२३) रा.बाळापूर, पूजा सुनील पवार (३०) रा.वडगाव, सुनील भास्कर पवार (४५) रा.वडगाव, तसेच वाहनचालक संतोष जोगदंड (४५) वडगाव, साधना बोंडारे रा.वडगाव, चंपाबाई पेंडलेवार (६५) रा.बाळापूर, देवीदास उपरे (२३) रा.बाळापूर, सोनू संतोष जोगदंड (६) रा.बाळापूर जि.हिंगोली हे जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.बाळापूर (जि.हिंगोली) येथील उपरे कुटुंबातील देवीदास याचा विवाह २४ एप्रिल रोजी साक्षी नामक युवतीशी पार पडला होता. २९ एप्रिल रोजी हे कुटुंबिय चंद्रपूर येथील महाकाली मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले. लष्करात जम्मूकाश्मिरला नेमणूक असलेल्या शंकर उपरे यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर उपरे कुटुंबिय देवीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी तेथेच जेवण केले. रात्री १० वाजता ते वणी मार्गे हिंगोलीकडे जायला निघाले. दरम्यान, रात्री २ वाजताच्या सुमारास मारेगाव येथील एका बारसमोर करंजीकडून आलेल्या १६ चाकाच्या अज्ञात ट्रकने महिंद्रा मॅक्स वाहनाला (एम.एच.३४-के.२४३८) धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक तेथून फरार झाला. धडक बसताच दोन-तीन पलट्या घेत वाहन १०० फूट रस्त्याच्या दूर फेकले गेले. अपघातापूर्वी मारेगाव येथील पेट्रोलपंपावर या वाहनात डिझेल भरण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
भीषण अपघातात हिंगोलीच्या नववधूसह तीन महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 2:59 PM
चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन बाळापूर (जि.हिंगोली) कडे महिंद्रा मॅक्स वाहनाने परत जात असताना जिल्ह्यातील मारेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तीन महिला ठार, तर आठजण जखमी झाले.
ठळक मुद्देआठ जखमीयवतमाळ-चंद्रपूर मार्गावर मारेगावची घटनामहाकालीचे दर्शन घेऊन परतत होते