हरीओम बघेललोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्ह्यात सिक्युरिटी कंपनीमध्ये जाॅब लावून देतो, अशी बतावणी करून एका ठगाने ६५ जणांना गंडा घातला. सर्वसामान्य कुटुंबातील बेरोजगाराने घरातील किडूकमिडूक विकून पैसा उभा केला. काहींनी दुचाकी विकली, कुणी शेळ्या विकल्या. तर स्वखर्चानेच कंपनीचे कार्यालयही उघडले. ही आपबिती आर्णी येथील अजय ठाकरे याने ‘लोकमत’ला दिली. एसआयएस सिक्युरिटी कंपनीमध्ये २० हजार रुपये पगाराची नोकरी लावून देतो, असे म्हणत प्रकाश ऊर्फ जगदीश राठोड, रा. घुई, ता. नेर याने अनेकांना गंडा घातला. यात त्याने फसविलेल्या युवकांचाच बनावट कार्यालय उघडण्यासाठी वापर केला. प्रकाशने आर्णी तालुक्यातील मुलांना नोकरीचे आमिष दिले. त्यासाठी प्रत्येकी ६५ हजार जमा करण्यास सांगितले. चांगली नोकरी मिळणार या आशेवर ज्या पद्धतीने शक्य होईल तशी जुळवाजुळव करून बेरोजगारांनी प्रकाशच्या हातात पैसे ठेवले. प्रकाश यावरच थांबला नाही. त्याने बेरोजगारांनाच आर्णी शहरात एआयएस सिक्युरिटी कंपनीचे कार्यालय उघडण्यास सांगितले. तेथील टेबल खुर्चाही बेरोजगार युवकांनाच आणावयास लावल्या. व्हाॅट्सॲप ग्रुप बनवून प्रकाश सर्वांच्या संपर्कात राहत होता. दोन ते तीन महिने युवकांनी स्वखर्चाने कारभार चालवला. वेतनाची मागणी करताच प्रकाश उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यवतमाळात काही युवकांना डेमो म्हणून खासगी रुग्णालयांमध्ये नोकरीसुद्धा करायला लावली. यवतमाळातील कोल्हे लेआउट माईंदे चाैक येथे कार्यालय उघडले. तेथे नोकरीचे आमिष देऊन युवकांना ठेवण्यात आले. १९ जुलै रोजी त्याने अमोलकचंद काॅलेजच्या मैदानात ६५ युवकांना बोलावले. मात्र, तो स्वत: आलाच नाही. ज्या मोबाइल क्रमांकावरून प्रकाश संपर्कात होता ते मोबाइल नंबरही त्याने बंद करून टाकले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्वांनाच जबर धक्का बसला. त्यानंतर आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अवधूतवाडी पोलिसांनी नोंदविले बयाणबेरोजगारांना फसविणाऱ्या ठगाने कोल्हे लेआउटमधील एसआयएस सिक्युरिटी कंपनीचा पत्ता दिला होता. ही बाब तक्रारीत नमूद होती. त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी गुरुवारी ठग प्रकाश राठोड याच्या संपर्कात असलेल्या सुपरवायझर व बाॅन्सर यांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. त्यांच्याकडून पसार असलेल्या प्रकाश राठोड याचा काही सुगावा लागतो काय, या फसवणुकीच्या गुन्ह्यात कोणाकोणाचा समावेश आहे याचाही शोध पोलीस घेणार आहे.