रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशन दुकानामधून धान्य वितरणासाठी पॉस मशिनचा प्रयोग हाती घेण्यात आला होता. यामध्ये असंख्य त्रृटी आढळल्या. आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी एईपीडीएस नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने हे सॉफ्टवेअर राज्यभरात वितरित करणे सुरू केले आहे. यामध्ये पारदर्शक धान्य वितरणासाठी अंगठा सक्तीचा करण्यात आला आहे. यातून धान्य वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. हे अद्ययावत मशिनच आपला अहवाल जिल्ह्यासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे सादर करणार आहे.रेशन दुकानातील धान्य काळयाबाजारात पोहचते. त्याला पायबंद घालण्यासाठी पॉस मशिनचा वापर सुरू झाला. अनेक ठिकाणी लिंक नसल्याने धान्य वितरणात आॅफलाईन पध्दतीने धान्य वितरीत केले जात होते. त्याचा अहवाल सादर करून नवीन कोटा मिळत होता. आता एप्रिलपासून पॉस मशिनमध्ये एईपीडीएस नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात आले आहे. यामुळे लिंक फेल होण्याचा प्रकार थांबणार आहे. मोबाईलवरील वायफाय अथवा इतर माध्यमातून संगणक आॅनलाईन करता येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबाला धान्य वितरित करायचे आहे, त्या कुटुंबाचा अंगठा सक्तीचा राहणार आहे. अंगठा या मशिनवर लावल्यानंतर तो आधारलिंक होणे गरजेचे आहे. आधार लिंक अंगठा आणि रेशन पुस्तकातील नाव यांचे ताळमेळ जुळल्यानंतरच धान्य वितरित होणार आहे.विशेष म्हणजे, छोट्या मुलांचा अंगठा या ठिकाणी चालणार नाही. मोठ्या जबाबदार व्यक्तीलाच हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. याकरिता गावपातळीवरील नागरिकांना अंगठा अपडेट करण्यासाठी आधार केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे. या मशिनवर धान्य वितरकाचे आणि धान्य खरेदीदारचे नाव, वेळ, दिनांक आणि उचल केल्याची किंमत घेतलेले पैसे असा संपूर्ण हिशेब राहणार आहे. हा जमा-खर्च विक्रेत्याला तालुका अथवा जिल्हा पातळीवर सादर करण्याची गरज नाही. आॅनलाईन पध्दतीने ही संपूर्ण माहिती या कार्यालयात काही सेकंदात जमा होणार आहे.
ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात वाटपज्या महिन्यात धान्य वितरित करण्यात आले, ते धान्य ३० अथवा ३१ तारखेपर्यंतच लाभार्थ्यांना वाटणे गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटच्या तारखेनंतर धान्य वाटप ‘लॅप्स’ होईल. इतर कोटा दुकानात शिल्लक आहे, असे गृहीत धरले जाणार आहे. यामुळे दुसऱ्या महिन्याला वितरित होणाºया एकूण कोट्यातून शिल्लक धान्य वजा करण्यात येणार आहे. उरलेले धान्य दुसºया महिन्याच्या कोट्यात दुकानदाराला मिळणार आहे. यामुळे शिल्लक धान्यातून होणारा गैरप्रकार पूर्णत: थांबणार आहे.
जोडीदाराला मिळणारे ३५ किलो थांबणारअंत्योदय योजनेत १ अथवा दोन व्यक्ती असणाऱ्या कुटुंबाला ३५ किलो धान्य वितरित करण्यात येत होते. आता अशा कुटुंबाला प्राधान्य गटात टाकण्यात येणार आहे. त्यांना चार ते पाच किलोच्या नियमानुसार मानसी धान्य मिळणार आहे. मात्र कोलाम समाजाला ३५ किलो धान्य मिळणार आहे.