संगणकाची तोडफोड : लिपिकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ पुसद : ‘माझ्या केसचा निकाल लवकर का लावत नाही’ असे म्हणत एका तरुणाने येथील न्यायालयात चांगला धुडगूस घातला. लिपिकासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत संगणकाची तोडफोड केली. ही घटना येथील न्याय मंदिरातील तिसरे दिवाणी सहन्यायालयात मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. राहुल रवींद्र तुंडलवार (२७) रा. काळी दौलत ता. महागाव असे धुडगूस घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे एक प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ आहे. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तो न्याय मंदिरातील तिसरे दिवाणी सहन्यायालयात दाखल झाला. कनिष्ठ लिपीक गजानन नामदेव बंड व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांना तुम्ही माझ्या केसचा निकाल का लावत नाही, असे जोरजोराने म्हणू लागला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर तो टेबलवरील संगणकाची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या प्रकाराने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. न्यायालय परिसरात बघ्यांची गर्दी झाली. शेवटी या तरुणाची समजूत घालून त्याला शांत करण्यात आले. या प्रकरणी कनिष्ठ लिपीक गजानन बंड यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राहुल तुंडलवारविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राहुलची नेमकी कोणती केस या न्यायालयात आहे, हे मात्र कळू शकले नाही. पुसद न्यायालयात घडलेल्या या प्रकाराची चर्चा संपूर्ण शहरात पसरली. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून नेमके कोणत्या कारणासाठी त्याने धुडगूस घातला याचा शोध पुसद शहर पोलीस घेत आहे. विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी पुसद बसस्थानकावर बॉम्ब असल्याची अफवा राहुलने पसरविली होती. त्यावेळी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली होती. त्याला त्यावेळी पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. (प्रतिनिधी)
न्यायालयात तरुणाचा धुडगूस
By admin | Published: November 18, 2015 2:36 AM