यवतमाळ : यंदाच्या उन्हाळ्यात तळपते ऊन आणि वादळी पाऊस जसे काय एकमेकांचा पाठलाग करीत आहेत अशी स्थिती आहे. मागील आठवड्यात उन्हाचा पारा ४३ डिग्रीपर्यंत गेल्याने यवतमाळकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. आता गुरुवारपासून पुन्हा वातावरणात बदल झाला. गुरुवारी नेर परिसरातील काही गावांना अवकाळी पावसाने झोडपले. शुक्रवारी दिवसभर यवतमाळसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच आता प्रादेशिक हवामान विभाग नागपूर पुढील काही दिवस जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच त्यानंतर २४ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजीही जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधरी यांनी केले आहे. दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने साडेतिनशे हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईची प्रतिक्षा असतानाच आता पुन्हा वादळी पावसाचा इशारा आल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे.