नाफेडची खरेदी बंद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १५ हजार क्विंटल तूर उघड्यावर पुसद : नाफेडने शनिवारपासून तूर खरेदी बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सर्वपक्षीय नेते यात सहभागी झाले होते, तर दुसरीकडे आजही बाजार समितीच्या यार्डात १५ हजार क्विंटल तूर उघड्यावर पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नाफेडची पुसद येथील तूर खरेदी १५ एप्रिलपासूनच बंद केली आहे. मात्र पंचनाम्यानुसार बाजार समितीत आलेला माल खरेदी करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले होते. यंदा तुरीचे उत्पादन प्रचंड वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. शासनाने चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला व ५०० रुपये अनुदान घोषित केले. त्यानंतर नाफेडने पाच हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली. या खरेदीसाठी तालुक्यात खरेदी-विक्री संघाला एजंट नेमले. कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा, चाळण्या व हमाल उपलब्ध करून दिले. नाफेडने दोनवेळा मुदतवाढ दिली. परंतु बाजार समितीच्या यार्डात १४ एप्रिलपर्यंत आलेली तूर तशीच होती. प्रत्यक्षात ती मुदत तूर खरेदीसाठी वाढवून दिली असली तरी शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप होवू शकले नाही. अशा स्थितीत नाफेडने शनिवारपासून तूर खरेदी बंद केली.पुसद बाजार समितीत शनिवारी तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून जवळपास १५ हजार क्विंटल तूर उघड्यावर पडलेली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये पडलेला आहे. सोमवारी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाजार समितीला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर ठिय्या आंदोलनाचा निर्णय झाला. येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात अॅड.सचिन नाईक, अॅड.उमाकांत पापीनवार, विकास जामकर, अभय गडम, पुंडलिक शिंदे, नारायण पुलाते, विश्वजीत लांडगे, दिलीप बेंद्रे, अॅड.चंद्रशेखर शिंदे, मधुकर कलिंदर, साकीब शाह, अरुण पवार, मस्के महाराज, गोपीनाथ गवळी, अवधूत मस्के, संजय राठोड, सुधाकर गादेवार, पंडित मस्के, एकनाथ भांगे, सुशील करे, भारत जाधव, धनराज राठोड, भगवान ठेंगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
पुसद येथे तूर खरेदीसाठी ठिय्या आंदोलन
By admin | Published: April 25, 2017 1:11 AM