लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गावेच्या गावे पिंजून काढत आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत एका अल्पवयीन मुलीचा धूमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला. गंभीर म्हणजे, सर्व माहीत असूनही या गुन्ह्यात खुद्द गाव समितीच शांत बसली. त्याहून गंभीर म्हणजे गाव समितीचे प्रमुख असलेले आजी व माजी सरपंच हेही वऱ्हाडी म्हणून या लग्नात सामील झाले.
कळंब तालुक्यात यवतमाळ-पांढरकवडा महामार्गावरील एका खेड्यात बुधवारी हा बालविवाह वाजतगाजत पार पडला. याची खबर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच गुन्हा दाखल करण्याची धडपड सुरू झाली. मात्र संबंधित गावातील बालसंरक्षण समिती म्हणजे, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका हे सारेच या विवाहाच्या बाजूने उभे राहिले. पोलिसात तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढे आले नाही.