संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, वणी (यवतमाळ): ड्यूटीवर तैनात असलेल्या वेकोली कर्मचाऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निलजई खुल्या कोळसा खाणीत (२) घडली. या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. तेथे उपस्थित अन्य कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला.
केशव बापूराव नांदे (५६, रा. वासेकर लेआऊट वणी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते निलजई कोळसा खाणीत फिटर पदावर कार्यरत होते. दुपारी ४ ते रात्री १२ या दुसऱ्या पाळीत ते ड्युटीवर तैनात होते. खाणीच्या पार्किंग एरियात काम करीत असताना मागून आलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांच्या मानेला व हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला होताच, केशव नांदे जोरजोराने ओरडले. हल्ला झाल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड करून वाघाला तेथून हुसकावून लावले.
त्यानंतर केशव नांदे यांना जखमी अवस्थेत घुग्घूस येथील राजीव रतन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाला मिळताच, वन विभागाचे एक पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती वणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे यांनी दिली. आमदार संजीवरड्डी बोदकुरवार यांनीदेखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून घटनेची माहिती घेतली. तसेच वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या.