मुकुटबन (यवतमाळ) : रात्री १२ वाजताची वेळ... खाणीतील काम आटोपून काही कामगार चारचाकी वाहनातून घराकडे परत जात असताना, खाण परिसरातील रस्त्यावर अचानक एक वाघ आडवा येताे. वाहनाच्या लाईटचा प्रकाश त्याच्या अंगावर पडताच, तो एक भलीमोठी डरकाळी फोडतो.
वाघाच्या गगनभेदी डरकाळीने कामगारांची भंबेरी उडते. वाघ नजर रोखून कामगारांच्या वाहनाकडे बघतो. केवळ बघतच नाही तर तो हळूहळू वाहनावर चाल करून येतो. ही बाब लक्षात येताच, वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन माघारी घेतले. सुदैवाने काही वेळानंतर वाघ तेथून निघून गेल्याने वाहनात बसून असलेल्या कामगारांचा जीव भांड्यात पडला.
मुकुटबनपासून अगदी जवळ असलेल्या बी. ई. ईस्पात या कोळसा खाण परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुकुटबन क्षेत्रात वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे. झरी तालुक्यात सातत्याने पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. या भागात वाघांची संख्या वाढली आहे. लागूनच टिपेश्वर अभयारण्य असल्याने या अभयारण्यातील वाघ शिकारीच्या शोधात अभयारण्याबाहेर पडून झरी तालुक्यातील जंगलात येत आहेत. या भागात वाघांचा मुक्तसंचार सुरू असल्याने जंगलातील रानडुकरांचे कळप वाघाच्या भयाने जंगलातून शेतशिवारात येत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यातून वाघ आणि मानव संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
झरी तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात वाघाचे बस्तान आहे. अनेकदा हे वाघ मानवी वस्त्यानजिक येऊन जातात. यातून एखादी मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. बी. ई. ईस्पात कोळसा खाणीच्या मार्गावर पहिल्यांदाच वाघाचे दर्शन झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुकुटबन वनपरिक्षेत्रात वाघाचा नेहमीच वावर असतो. अनेकदा नागरिकांना या भागात वाघाचे दर्शन झाले आहे. वणी- घोन्सा मार्गावरील जंगलातदेखील वाघाचा वावर आहे. मागील पंधरवड्यात या भागात वाघाने पाळीव जनावरांची शिकार केली. वन विभागाने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
मुकुटबन परिसरात वाघाचा वावर आहे. नेमकी संख्या सांगता येत नाही. नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने शेतात किंवा जंगलात एकटे न जाता समूहाने जावे. शक्यतो रात्रीच्यावेळी शेतात जाताना मोबाईलवरील मोठ्या आवाजात गाणी लावावी.
- विजय वारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुकुटबन, ता. झरी.