लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्या समूहावर वाघाने हल्ला करून एका ६० वर्षीय इसमाला गंभीर जखमी केल्याची घटना झरी तालुक्यातील हिवरा (बारसा) येथे बुधवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दामू बापूराव आत्राम (६०) रा. हिवरा बारसा ता. झरी असे जखमीचे नाव आहे. पांढरकवडापासून दहा किलोमीटर अंतरावरील हिवरा येथील सात ते आठ आदिवासी बांधव धार्मिक कार्यक्रमासाठी बुधवारी दुपारी पांढरकवडा मार्गाने येत होते. त्यावेळी काही कळायच्या आत एका पट्टेदार वाघाने हल्ला केला. वाघाच्या तावडीत दामू आत्राम सापडला. त्याच्यावर मागून पंजाने वार केले. तो भीतीने ओरड खाली कोसळला. त्याच वेळी सोबत असलेल्या सहकाºयांनी वाघाच्या दिशेने काठ्या भिरकावून त्याला पळवून लावले. तोपर्यंत दामू गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. दामूला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दामूच्या पाठीवर, कानाजवळ व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पांढरकवडा रुग्णालयात वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे यांनी भेट दिली. प्रकृती गंभीर असल्याने दामूला यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघ दिसल्याची चर्चा होती. त्यातच आदिवासी बांधवांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने वांद्यांचा गजर होत होता. तळपते उन्ह आणि वांद्यांचा गजर यामुळे वाघ चिडून गेला होता. त्यातूनच त्याने हल्ला केला असावा, असे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
हिवरात भरदुपारी वाघाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:00 AM
धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्या समूहावर वाघाने हल्ला करून एका ६० वर्षीय इसमाला गंभीर जखमी केल्याची घटना झरी तालुक्यातील हिवरा (बारसा) येथे बुधवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देइसम गंभीर : झरी परिसरात भीतीचे वातावरण