सहा तास रास्ता रोको : लासिना येथे तणावसदृश परिस्थती सोनखास : सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या भोंगळ कारभाराचा परिचय दिल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लासिना येथे तब्बल सहा तास रास्तारोको केला. गतिरोधक लावण्यासाठी दिलेली १२ ची वेळ टळल्याने नागरिकांचा संयम सुटला. शनिवार ७ मार्चच्या सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास लासिना येथील अभय गौतम सोनोने (२५) या युवकाला ट्रकने चिरडले. त्यानंतर नागरिकांनी लासिना येथे रास्तारोको करून वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लासिना, वाघापूर आणि बिजापूर येथे सोमवारी दुपारी १२ वाजतापर्यंत गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही वेळ निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी लासिना येथे पाईप, झाडे टाकून आणि टायर जाळून रस्ता अडविला. तब्बल सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कंगाले, नेरचे ठाणेदार गणेश भावसार, जिल्हा वाहतूक निरीक्षक विलास वांदिले, लाडखेडचे ठाणेदार सुभाष क्षीरसागर दाखल झाले. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून परिस्थितीची जाणीव करून दिली. यानंतर लासिना येथे गतिरोधकाचे काम हाती घेण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा करून देण्यात आला. (वार्ताहर)
१२ ची वेळ टळली अन् संयम सुटला
By admin | Published: March 10, 2015 1:19 AM