प्रकाश लामणे
पुसद : कोरोना महामारीने सगळ्यांचेच जगणे अवघड झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व स्तरांतील व्यावसायिकांना झळ सोसावी लागत आहे. त्यातील एक उपेक्षित घटक नृत्य कलावंत आहेत.
जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतील नृत्य कलावंतांचे नृत्य वर्ग (डान्स क्लास) हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नातील सांगीतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आदी अनेक माध्यमांतून हा व्यवसाय उदयास आला. मात्र, कोरोनाचे संकट येऊन ठेपले आणि नृत्य वर्गावर अवलंबून असणारे अनेक कलावंत आता रस्त्यावर आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील नृत्य कलावंतांसमोर खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्याकडे रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. नृत्य शिकवून, नृत्यकला जोपासून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. जिल्ह्यातील शंभराहून अधिक नृत्य शिक्षक जिल्ह्यातील विविध भागांत शिकवणी वर्ग घेऊन आपल्या कलेची जोपासना करीत आहेत. यातून ते सांस्कृतिक वारसा जतन करीत आहेत. मात्र, कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या नियमान्वये डान्स क्लास बंद आहेत. परिणामी त्यांच्याजवळचा होता नव्हता रोजगारही निघून गेला. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर नृत्यकलेमध्ये आपले करियर करू पाहणाऱ्यांमध्ये जगण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
बॉक्स
नवीन पिढीसमोर उभे ठाकले संकट
ग्रामीण भागात अनेक युवक नृत्यकला शिकत आहेत. मात्र, वर्ग बंद असल्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. शिक्षकांवरही संक्रांत आली आहे. यामुळे नवीन पिढी नृत्यकलेपासून दूर जाण्याचा धोका वाढला आहे. ही कला आता कोण जोपासणार, असा प्रश्न आहे.
कोट
शासनाने समाजातील इतर घटकांना लॉकडाऊनच्या काळात जशी मदत केली, तशीच नृत्य कलावंतानाही तात्काळ भरघोस मदत जाहीर करावी. लोककलावंतांना जगण्यास उभारी द्यावी.
अमोल भालेराव, नृत्य शिक्षक, पुसद.