यवतमाळ : आर्थिक संकटामुळे यवतमाळची प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी बंद पडली होती. ही सूतगिरणी प्रायोगिक तत्त्वावर भाड्याने देण्याचा ऐतिहासिक निर्णय विशेष बाब म्हणून घेतला. आता ही गिरणी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने सुरू झाली आहे. या गिरणीप्रमाणेच राज्यातील इतरही बंद सूतगिरण्या सुरू करण्याचा मानस असून, यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या लोकार्पण सोहळ्यात शुक्रवारी यवतमाळ येथे ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होते. याप्रसंगी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविश्यांत पांडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी यवतमाळसारख्या मागासलेल्या भागात प्रियदर्शनी सूतगिरणीची स्थापना करून शेकडो बेरोजगारांना काम दिले. सहा हजारांपेक्षा अधिक शेतकरी सभासद असलेली ही राज्यातील एकमेव सूतगिरणी असल्याचे गौरवोद्गार काढत ही गिरणी पुन्हा सुरू होण्याचे सत्कार्य माझ्या हातून घडले, याचा मला रास्त अभिमान असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात बंद पडलेल्या सहकारी सूतगिरण्या पूर्ववत सुरू करून अर्थचक्र गतिमान करण्याचा वस्त्रोद्योग विभागाचा प्रयत्न आहे. डॉ. विजय दर्डा यांच्या विशेष आग्रहातून प्रियदर्शनी सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी साखर कारखाने चालवायला दिले होते, परंतु सूतगिरणीबाबत असा निर्णय कधी झाला नव्हता. मात्र हा प्रयोग या सूतगिरणीने यशस्वी करून दाखविला. आता नवीन सूतगिरणीचे प्रस्ताव आणण्यापेक्षा बंद पडलेल्या सहकारी सूतगिरण्या पुनरुज्जीवित करून भाडेतत्त्वावर देण्याबाबतचे प्रस्ताव आल्यास सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्द पाटील यांनी दिला. डॉ. विजय दर्डा यांनी विजेचा वाढता खर्च कमी होण्याच्या दृष्टीने अनुदानासंबंधीची मागणी केली आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.
प्रियदर्शनीच्या माध्यमातून जिल्हावासीयांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले. डॉ. विजय दर्डा यांच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.
कर्जमुक्त झालेली एकमेव सूतगिरणी : डॉ. दर्डा- प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी २००७ मध्ये सुरू झाली. चार वर्षांत या संस्थेने देशभरात नावलौकिक मिळविला. २०१२ मध्ये गिरणीचा विस्तार केला. आता २८ हजार चात्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. - सहकारी बॅंकेचे कर्ज न घेता कमी खर्चात उभारलेली आणि कर्जमुक्त झालेली ही राज्यातील एकमेव सूतगिरणी असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात सांगितले. - प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असून, इतर सूतगिरण्यांप्रमाणे याही सूतगिरणीला युनिटमागे ३ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.