तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन : एकाच वेळी लाखो लोक घेणार शपथयवतमाळ : ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने एकीकडे अंमली पदार्थांची लयलूट होत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र गावागावात हजारो गावकऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देणार आहेत. नव्या वर्षात पदार्पण करताना जिल्ह्याला तंबाखूमुक्त जीवनाची भेट देणाऱ्या या उपक्रमाची ‘लिम्का बुका’तही नोंद होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तंबाखूमुक्त शाळेसाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आता सलाम बॉम्बे फाऊंडेशनचीही मदत घेतली जात आहे. गेल्या नवरात्रौत्सवाच्या काळात विशेष कृती आराखडा राबवून तब्बल १५१ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. आता २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक शाळा आणि शाळेच्या क्षेत्रातील प्रत्येक माणूस तंबाखूपासून दूर जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी २३ डिसेंबरलाच सर्व केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांशी चर्चा करून ३१ डिसेंबर हा दिवस ‘तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जुन्या वर्षाला निरोप देताना दरवर्षीच मोठ्या प्रमाणात लोक व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे याच दिवशी व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अवधुत वानखडे आणि चंद्रबोधी घायवटे या शिक्षकांना तंबाखूमुक्त चळवळीचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याच माध्यमातून तंबाखूमुक्त संकल्प दिनाचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. लिम्का बुक आणि इंडिया बुकच्या निकषानुसार दोन लाख लोकांनी एकत्र शपथ घेण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात साधारण तीन लाख लोक एकत्र शपथ घेण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सलाम बॉम्बे फाऊंडेशनसह गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक जोरदार प्रयत्न करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ंसीईओंच्या आवाजात शपथ, ईओंचे गावकऱ्यांना आग्रहपत्रजिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये एकाच वेळी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ घेतली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाजातील शपथ रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ती प्रत्येक शाळेत ऐकविली जाणार आहे. या संकल्प दिनाच्या कार्यक्रमात प्रत्येक गावकऱ्याने सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष यांना खास ‘आग्रहपत्र’ पाठविले आहे.तातडीने द्या अहवालतंबाखूमुक्त जीवनाच्या संकल्पाचा हा उपक्रम लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणार आहे. यासाठी सर्व शाळांकडून २ जानेवारीपर्यंत अहवाल मागविला आहे. ३१ डिसेंबरला शपथ घेणाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी खास ‘स्वाक्षरीपट’ शाळेला पाठविण्यात आला आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत.
तंबाखूमुक्ती जाणार ‘लिम्का बुका’त
By admin | Published: December 27, 2015 2:52 AM