महानाट्य : एक तेजस्वी जीवनदर्शन, कर्नाटकातील गुलबर्गा येथे प्रयोगाचे प्रथम सादरीकरणयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वास यवतमाळातील समता मैदानात सुरूवात झाली आहे. शुक्रवार, ८ एप्रिल रोजी ऐतिहासिक महानाट्य ‘महानायक सम्राट अशोक’ सादर होणार आहे. या महानाट्याचा सार प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी मांडला आहे.आंबेडकरी विचारांनी भारावलेल्या लेखक व कलावंतांनी आंबेडकरी जलशांच्या माध्यमातून मांडलेला आपला जीवन आकांत, पुढे पथनाट्य आणि रंगमंचीय नाट्यातूनही साकार होवू लागला. या महानाट्य परंपरेतील एक तेजस्वी महानाट्य म्हणजे, हबीर अंगार ई लिखित आणि अशोक जांभूळकर दिग्दर्शित ‘महानाट्य - महानायक सम्राट अशोक’ हे होय.बुद्धिस्ट परफार्मिंग आर्टस् नागपूरद्वारा निर्मित या महानाट्याचा पहिला प्रयोग २८ नोव्हेंबर २०१० ला कर्नाटकातील गुलबर्गा याठिकाणी सादर झाला. जगाच्या प्राचीन इतिहासाच्या अहंकाराचा पिसारा फुलून यावा असे अशोकाचे कर्तृत्व. परंतु वैदिक परंपराविरोधामुळे कालाशोक, चांडाळ अशोक, चारित्र्यहीन, भावांचा हत्यारा, कुरूप अशा नाना विशेषणांनी त्यांना रक्तबंबाळ करण्यात आले. गेल्या काही वर्षात आंबेडकरी इतिहासकारांनी इतिहासाच्या गर्भातील अंधारावर सत्य प्रकाशाचा झोत टाकण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्या प्रयत्नातील एक भाग म्हणजेच ‘महानायक सम्राट अशोक’ हे महानाट्य होय. सम्राट अशोकाचे लखलखीत जीवन दर्शन जवळपास १०० कलावंत या महानाट्यातून सादर करणार आहेत. भव्य रंगमंच, उच्च कोटीचे नेपथ्य, अभ्यासपूर्ण वेशभूषा, ध्वनी व प्रकाशाचा वापर यात करण्यात आला आहे. प्राचीन भारतीय वेशभूषेचा लेण्यातील शिल्प आणि पेंटिंगचा विशेष अभ्यास करून वंदना जांभूळकर यांनी या नाटकातील पात्रांची वेशभूषा निश्चित केल्याने महानाट्याला वास्तवतेचा स्पर्श झाला आहे. चंदू सोरटेंची प्राचीन भारतीय राजवैभव प्रकट करणारी नियोजनता, नेपथ्य रचना आणि शैलेंद्र दाणींच्या संगीत नियोजनात हे महानाट्य लक्षणीय ठरले आहे. सुरमणी प्रभाकर धाकडे, प्रा. अनिलकुमार खोब्रागडे, प्रा. अहिंसा तिरपुडे, आकांक्षा नगरकर देशमुख आणि संपदा जैन यांनी यातील गाणी गायली आहेत. हबीर अंगार ई लिखित, अशोक जांभूळकर दिग्दर्शित भव्य रंगमंचावर साकार होणारे सम्राट अशोकाचे तेजस्वी जीवनदर्शन म्हणजे आंबेडकरी नाट्य चळवळीतील एक आश्वासक आणि दमदार सांस्कृतिक वाटचालीचे भक्कम पाऊल होय, असेच म्हणावे, लागेल. (वार्ताहर)
समतापर्वात आज ‘महानायक सम्राट अशोक’
By admin | Published: April 08, 2016 2:20 AM