लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. २४ तासांतील पावसाच्या नोंदी या १०० मिमीपेक्षा अधिकच्या आहेत. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात पावसाने रेकॉर्ड मोडला आहे. २४ तासांत १७५ मिमी पाऊस झाला. तर लगतच्या धानोरा मंडळात १५३ मिमीची नोंद झाली आहे. जून महिन्यात पावसात तूट होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. शासकीय निकषाप्रमाणे ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर केली जाते. जिल्ह्यातील बाभुळगाव, कळंब, वणी, मारेगाव, राळेगाव या तालुक्यातील १९ मंडळांमध्ये सरासरी १०० मिमी पाऊस झाला आहे. तर राळेगाव तालुक्यात दीडशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाची कोसळधार जिल्हावासीयांना अनुभवास येत आहे. अचानक वाढलेल्या पावसाच्या जोराने अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेक भागात पूल वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. पावसाचा हा जोर आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सोसावा लागतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाच वर्षांनंतर विक्रमी पाऊस - काही मंडळामध्ये २४ तासांत १४० मिमी पाऊस कोसळला. यातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमी वेळात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची पाच वर्षांतील पहिलीच वेळ आहे. - अरबी समुद्राकडील वारे सरळ विदर्भाच्या दिशेने खेचले जात आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने विदर्भाकडे हे वारे आकर्षित होत आहे. यासोबतच अरबी समुद्रामध्ये सतत कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. - एका तासात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस कोसळला तर ढगफुटी मानली जाते. परंतु २४ तासांत जर हा पाऊस पडला तर तो अतिवृष्टीमध्ये नोंदविला जातो. - अतिवृष्टीमुळे शेतशिवारातील सुपीक माती वाहून गेली आहे. यातून जमिनीवरील खडक उघडा पडला. नदी काठच्या गावांमध्ये ही भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी जमीन पूर्ववत करण्यास अनेक वर्षे लागणार आहे.
मंडळनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी - बाभुळगाव तालुका - घारफळ १४१, कळंब तालुका - पिंपळगाव १०४.५, सावरगाव १०१, वणी तालुका - वणी ९४.८, राजुर ११५.५, पुनवट ९६, शिंदोला ९२, रासा ११३.५, शिरपुर १४६, गणेशपुर १२२.५, मारेगाव तालुका - मारेगाव ८३, मार्डी ९४, वनोजा ८९.३, राळेगाव तालुका - राळेगाव १७५, झाडगाव १०६, धानोरा १५३, वाढोणा बु १०२, वरध ८५.८.जिल्ह्याला तीन दिवसांचा रेड अलर्ट - यापूर्वी हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केला होता. आता त्या पाठोपाठ रेड अलर्ट जाहीर केला आहे. यामुळे अनेक भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती विभागाची यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
२५ गावांचा तुटला होता संपर्क - जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरू झाले आहे. मागील २४ तासांत कोसळधार पाडल्याने २५ गावांचा संपर्क तुटला होता. यामध्ये राळेगाव तालुक्यातील रावेेरी, वरुड, आष्टा, धानोरा, रेवती या पाच गावांचा समावेश होता. तर वणी तालुक्यातील २० गावांचा समावेश आहे. आता येथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. यासोबतच राळेगाव तालुक्यातील सहा, तर वणी तालुक्यातील ११ मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली होती. ती आता सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
३५७ हेक्टर वरील पीक पाण्याखाली- पावसाची कोसळधार आल्याने जिल्ह्यातील ३५७ हेक्टरमधील पीक पाण्याखाली आले होते. राळेगाव तालुक्यातील १७० हेक्टर, झरी तालुक्यातील २० हेक्टर, मारेगाव तालुक्यातील ११७ हेक्टर, वणी तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील पिकांमध्ये पाणी शिरले आहे. आता हे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
पुरामुळे जिल्ह्यात पाच जनावरांचा मृत्यू- पावसामुळे झरी तालुक्यात दोन बैल वाहून गेले. तर वणी तालुक्यात वीज पडून म्हैस व बैल ठार झाला. तर एक गोऱ्हा पुरात वाहून गेला. पाच जनावरांचा पावसात बळी गेला. याशिवाय आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. राळेगावमध्ये एक, झरी एक व वणी तालुक्यात सहा घरांची पडझड झाली आहे.