दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच राहतात. असाच अनुभव तालुक्यातील आरंभी येथे येत आहे.
तालुक्यात आरंभी हे गाव सर्वांत मोठे म्हणून ओळखले जाते. मात्र, गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहेत. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने मजला छळले होते’, असे गजलकार सुरेश भट हे सांगून गेले आहेत. मात्र, मरणाने सुटका केली तरीही गावकऱ्यांसाठी हा अभिशाप ठरताना दिसत आहे.
पावसाळा आणि उन्हाळ्यात ही समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात. हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखल तुडवीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरात ठेवावे लागतात.
उन्हाळ्यातदेखील चटके खात उभे राहून अंत्यसंस्कार करावे लागतात. गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नाही, ही शोकांतिका आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे, मृतांच्या नातेवाइकांसाठी खूप त्रासदायक ठरते.
बॉक्स
लहान गावांत सुविधा उपलब्ध
आरंभीनजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी, वडगाव, झिरपूरवाडी या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र, लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी येथे सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून मृतदेहाची होणारी विटंबना थांबवावी, अशी अपेक्षा आहे.