सुरेंद्र राऊत
यवतमाळ : विदर्भ व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, उमरखेड, किनवट, हिमायतनगर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये २००९ ते २०११ या काळात सिरीअल किलरची दहशत होती. शेतात काम करणाऱ्या महिलांना लुटण्यासाठी गळा आवळून खून करीत होता. अनेक घटनांमध्ये त्याने महिलांवर अत्याचारही केले. त्याच्याविरोधात तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत, तर जबरी चोरीचे अनेक गुन्हे पोलिस रेकॉर्डवरही आलेले नाही. या नराधमाने छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहातून बाहेर येताच उमरखेड तालुक्यातील पळशी फाटा येथे ११ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. पोलिसांनी शिताफीने या नराधमाला अटक केली. त्याच्या जुन्या कारनाम्यांची आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्या दहशतीची भीती अजूनही परिसरातील नागरिकांच्या मनात घर करून आहे.
अजीज खान मोहंमद खान पठाण (४४, मूळ रा. जळगाव, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, ह.मु. रा. नागापूर रुपाळा, ता. उमरखेड) असे या नराधमाचे नाव आहे. त्याने हिमायतनगर परिसरात महिलांना लुटत त्यांच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढत उमरखेड तालुक्यातील नागापूर येथे आश्रय घेतला. या नराधमाच्या दहशतीची सलग तीन वर्ष नागरिकांनी सोसले. त्या काळात एकटी महिला शेतात कामाला जायला घाबरत होती.
शेतात काम करणाऱ्या महिलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळायचा. तिच्या अंगावरील दाग-दागिने हिसकावून घ्यायचे. महिलांवर अत्याचार करायचा, अशी या नराधमाच्या गुन्ह्याची पद्धत होती. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. नांदेडचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक संदीप बिष्णोई आणि अधीक्षक संदीप कर्णिक यांनी विशेष पथक तयार करीत आरोपीची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले. ट्रॅक्टरचालक हवा आहे, त्याच्या शोधात आम्ही आलोय असा बनाव करीत पोलिस निरीक्षक ढोले यांच्या पथकाने नराधमाला २०११ मध्ये उमरखेड तालुक्यातून अटक केली.
पुढे न्यायालयाने त्याला जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगली, तर खुनाच्या दहा गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली. दोन गुन्ह्यांमध्ये त्याला आजन्म कारावास ठोठावला गेला. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील सत्र न्यायालयात खटला सुरू असताना अजीज खान याने भर न्यायालयात न्यायाधीशाला बुट फेकून मारला होता. याच न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन गुन्ह्यात या आरोपीला जामीन मंजूर केला. २० सप्टेंबर २०२३ रोजी हा आदेश आला. २६ सप्टेंबरला अजीज खान कारागृहातून बाहेर पडला. २९ सप्टेंबर रोजी तो उमरखेड येथे पोहोचला. त्यानंतर दोन दिवसातच त्याने ११ वर्षाच्या विद्यार्थिनीवर शेतात नेऊन अत्याचार केला. उमरखेड व यवतमाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी लगेच हाती लागला. त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. २००६ पासून गंभीर गुन्हे करणाऱ्या अजीज खान मोहंमद खान पठाण याचा जामीन रद्द करावा यासाठी पोलिस न्यायालयात धाव घेणार आहेत.
पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न
पळशी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर अटक करण्यात आलेला अजीज खानने पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरला. नंतर त्याने गळफास लावत आत्महत्या करण्याचाही बहाणा केला. या सर्व कृत्यातून पोलिसांवर दबाव आणता येईल, असा त्याचा प्रयत्न होता.
चौकशीत पोलिसांनाच प्रतिप्रश्न
सराईत गुन्हेगार असलेल्या अजीज खान याला न्यायालयीन व पोलिस कारवाईची प्रक्रिया पुरेपूर माहीत झाली आहे. पळशीच्या घटनेत अटक केल्यानंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच तो प्रतिप्रश्न करीत होता. पंच कोण, कुठे अटक दाखविली, घटनास्थळ काय असे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केले होते.