मोबदल्याची मागणी : निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारीच मिळेनायवतमाळ : उच्चदाब वाहिनी टाकताना शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेकडो शेतकरी बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर धडकले. मात्र निवेदन घेण्यासाठी कोणताही अधिकारी भेटला नाही. परिणामी शेतकरी संतप्त होऊन घरी परतले. यवतमाळ जिल्ह्यातून उच्चदाब वाहिनीचे विविध कंपन्यांचे टॉवर उभारणीचे काम करण्यात आले. यावेळी अनेकांच्या शेतात टॉवर उभारण्यात आले. अनेक शेतकऱ्यांची २० ते २५ गुंठे जमीन या टॉवरमुळे पडिक झाली आहे. या शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ होत आहे. कंपनीकडे विनंती करूनही शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी आज येथील जिल्हा कचेरीवर धडक दिली. शेकडो शेतकरी या ठिकाणी पोहोचले. मात्र त्यांची कैफियत ऐकून घेण्यासाठी कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता. सर्व अधिकारी महसूलच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करून माघारी फिरले. आपल्या मागण्यांचे निवेदन आवक-जावक विभागात सादर केले. यावेळी गजानन संदावार, धर्माजी मंगाम, महेश भानारकर, पांडुरंग ताजने, नामदेव शिंदे, नितीन खडसे, विजय राठोड, गोविंद जाधव या शेतकऱ्यांसह पुसद तालुक्यातील शिळोणा, गौळ खुर्द, केळापूर तालुक्यातील पहापळ यासह विविध गावातील टॉवरग्रस्त शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (शहर वार्ताहर)
टॉवरग्रस्तांची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Published: November 19, 2015 3:10 AM