गावातीलच अल्पवयीन मुलीशी आंतरजातीय विवाह करणे बळीला चांगलेच महागात पडले. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम असलेल्या मुलीशी विवाह केला. त्या मुलीच्या कुटुंबियांची सामाजिक व आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची असल्याचे कारण पुढे करून बळीला त्याच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढून दिले. हाताशी काम नाही आणि घरच्यांचा आधार नाही अशा स्थिती बळीने सासऱ्याकडेच त्याच्या झोपडीवजा घरात आश्रय घेतला. घरच्या शेतातील उत्पन्नाचा वाटाही बळीला नाकारण्यात आला. मोठ्या भावाने गावातील व्यापाऱ्याला विकलेल्या धान्यापैकी काही रक्कम मिळावी यासाठी बळीने वाद घातला. यातूनच खुनाची घटना घडली. प्रेमाचा खडतर मार्ग अनेक परीक्षा द्यायला लावतो. संसाराचा गाडा हाकताना प्रेमाची नशा पार उतरुण जाते. असाच काहीसा प्रत्यय उमरखेड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बिटरगाव येथील बळीराम उर्फ बळी गणपत तुपेकर (२४) याला विवाहानंतर अगदी काही महिन्यातच आला. घरची स्थिती बऱ्यापैकी आणि गावात दगडामातीचे का होईना टुमदार घर अशा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या बळीचे गावातीलच एका मुलीवर प्रेम जडले. त्याने समाजच नव्हे तर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेयसीला दिलेला शब्द पाळला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. बळीला त्याच्या भावाने घरातून बाहेर काढले. या स्थितीत हाताला रोजगार नाही. गाठीशी पैसा नसल्यामुळे शेवटी सासऱ्याकडेच आश्रय घ्यावा लागला. तेथेही बेताची परिस्थिती असल्याने बळीने गावात पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. यातून जमवलेली रक्कम सुरक्षेच्यादृष्टीने विश्वासू असलेल्या धान्य व्यापारी व्यंकटेश वसंतरा वट्टमवार (४७) यांच्याकडे ठेवण्यास दिली. गावगाड्यातील विश्वासाचा व्यवहार नेहमीच केला जात होता. घटनेच्या दिवशी बळी हा कुऱ्हाड घेऊन जंगलात २५ मार्चच्या सायंकाळी लाकुड तोडण्यासाठी जात होता. सहजच त्याची नजर वट्टमवार यांच्या दुकानावर पडली. तेथे सावकार वट्टमवार हे एकटेच बसून होते. हीच संधी साधून बळीने वट्टममवार यांच्याकडे ठेवलेले पैसे आणि भावाने विकलेल्या १५ पोते सोयाबीनपैकी अर्ध्या रकमेची मागणी केली. याला वट्टमवार यांनी विरोध केला. व्यवहार भावासोबत असल्याने पैसेही त्यालाच देणार, असे सांगितले. यातून शाब्दीक वाद वाढत गेला. सावकाराचा शब्द जिव्हारी लागल्याने बळीने हातातील कुऱ्हाडीने वार केला. यानंतर वट्टमवार हे उठून बाहेर आले. आता आपली तक्रार होईल, आपण यात अडकू या भीतीतून बळीने वट्टमवार यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. यामुळे वट्टमवार रक्ताच्या थारोळ््यात जागेवरच कोसळले. त्यानंतर बळीने घटनास्थळावरून पळ काढला. तो आपल्या पत्नीला घेऊन शेताच्या रस्त्याने कोठा येथे आला. नंतर त्याने १० किलोमीटर अंतरावर असलेले हिमायत नगर पायदळ गाठले. तेथे रेल्वे स्टेशन परिसरात गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड फेकून दिली. रेल्वेत बसून बळी व त्याची पत्नी दोघेही परभणी जिल्ह्यातील मिरखेल या गावी आश्रयाला गेले. तेथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या शेतावर ते थांबल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. इकडे सायंकाळी पोलीस ठाण्यासमोर व्यापाऱ्याचा खून झाल्याने खळबळ निर्माण झाली. पोलिसांवर आरोपींचा शोध घेण्यासाठी दबाव वाढला. इतकेच नव्हे तर वट्टमवार कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेऊन आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली. एकाचवेळी तपास, कायद व सुव्यवस्था राखण्याचा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला. घटनेत प्रत्यक्षदर्शी नसल्याने तसेच वट्टमवार यांचा तसा कुणाशी वाद नसल्याने संशय व्यक्त करणेही शक्य होत नव्हते. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेऊन ठाणेदार सहाय्यक निरीक्षक सूरज बोंडे यांनी तपासाची दिशा निश्चित केली. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक शिवाजी लष्करे, उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पथकातील कर्मचारी हरीश राऊत, भीमरा शिरसाट आणि बिटरगाव ठाण्यातील कर्मचारी दिगांबर मुसळे, रवी गीते, गणेश सूर्यवंशी, युनूस भातन्से, अल्ताफ शेख यांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. गावात असलेली डावखुरी व्यक्ती कोण, सोबतच उजव्या पायात व्यंग एवढ्या सुगाव्यावर तपास सुरू केला. अखेर बळीचे नाव पुढे आले. नंतर सायबर सेलची तांत्रिक मदत घेऊन बळीचा माग काढण्यात आला. शेवटी त्याला परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथून ताब्यात घेतले. आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्याून वाद झाला. याच वादातून खून केल्याचे बळीने पोलिसांपुढे सांगितले.
धान्याच्या पैशासाठी बळीरामने घेतला व्यापाऱ्याचा बळी
By admin | Published: April 02, 2017 12:22 AM