यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १२४ बसस्थानकांवर महिलांची कुचंबणा होत आहे. या बसस्थानकांवरील प्रसाधनगृह अस्वच्छ असल्याने वापरायोग्य नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. खुद्द महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ही परिस्थिती पाहता स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला उधळी लागली असल्याचे दिसून येते.
महामंडळाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविले जात आहे. बसस्थानक टापटीप राहावे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय असावी, बस लागल्याची सूचना देण्यासाठी माइक असावा, वेळ पाहण्यासाठी दर्शनी भागात घड्याळ लागलेले असावे, एसटीच्या योजनांची माहिती लावलेली असावी, विद्यार्थ्यांना पास, हिरकणी कक्ष असावे, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह आणि ते स्वच्छ ठेवावे, मूत्रीघर आणि प्रसाधनगृह वापरायोग्य असावे, एसटी बस स्वच्छ केलेली असावी, आदी बाबी महामंडळाला या अभियानात अभिप्रेत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अभियानाचे दुसरे सर्वेक्षण करण्यात आले.
दैनंदिन कामाचा हा भाग असताना राज्यातील ५६३ बसस्थानकांपैकी केवळ ९४ बसस्थानके अभियानातील काही निकष पूर्ण करू शकली. १२४ बसस्थानकांवरील प्रसाधनगृह वापरायोग्य नाही ही गंभीर बाबही समोर आली. मलमूत्र विसर्जनाची सुविधा मिळणे हा मानवी हक्क आहे. मात्र, प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत या मूलभूत गरजेकडे महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. बसस्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. तरीही प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेत निष्काळजीपणा सुरू आहे.
सर्वाधिक अस्वच्छतेचे विभाग
महामंडळाच्या सातारा विभागात सर्वाधिक अस्वच्छ प्रसाधनगृह आहे. या विभागातील ३४ पैकी नऊ बसस्थानकातील प्रसाधनगृह अस्वच्छ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर व रायगड विभागात प्रत्येकी आठ, तर रत्नागिरी आणि पुणे विभागात प्रत्येकी सात बसस्थानकावरील प्रसाधनगृह दयनीय स्थितीत आहे. अस्वच्छ प्रसाधन गृहाच्या यादीत राज्यातील जवळपास सर्वच विभागाचा समावेश आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
९३ बसस्थानकांची कामगिरी चांगली
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात राज्यातील ९३ बसस्थानकांना 'चांगला' शेरा मिळाला आहे. यामध्ये सातारा विभागात आठ, अमरावती, सोलापूर, प्रत्येकी सात, भंडारा सहा, नाशिक व सांगली प्रत्येकी पाच, लातूर, नागपूर विभागात प्रत्येकी चार बसस्थानकांचा समावेश आहे. उर्वरित विभागातील तीन व त्यापेक्षा कमी बसस्थानक 'चांगल्या'च्या यादीत आहे.
३२ बसस्थानकांना पुरस्काराची संधी
७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या बसस्थानकांचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार आहे. दुसऱ्या सर्वेक्षणातील ३२ बसस्थानकांना ही संधी आहे. यामध्ये महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील पाच बसस्थानक, मुंबई प्रदेशातील दोन, नागपूर प्रदेशातील नऊ, पुणे आठ, नाशिक चार आणि अमरावती प्रादेशिक विभागातील चार बसस्थानकांचा समावेश आहे.