केंद्रीय चमूने सुरवातीला तालुक्यातील मारेगाव (मोरवा) येथे भेट दिली. कापूस पिकाची पाहणी केली असता, गुलाबी बोंडअळी, फुलकिडे व बोंडसड प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता निरीक्षण करून गुलाबी बोंडअळीचे व फुल किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले. निरीक्षणाकरिता एकरी दोन कामगंध सापळे उभारून त्यामध्ये सलग तीन रात्रीतून आठ पेक्षा जास्त नर पतंग आढळून आल्यास निंबोळी अर्काची फवारणी करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास शिफारशी प्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी विषबाधा होऊ नये याची काळजी घेऊन करावी व दोन किंवा जास्त कीटकनाशकांची एकत्र मिसळून फवारणी करू नये, असा सल्ला दिला. तसेच बोंडसड करिता या आठवड्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशकाची तीन ग्रॅम व स्ट्रेप्टोसायकलिन सल्फेट एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. या भेटीदरम्यान तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार, मंडळ कृषी अधिकारी दिनेश चव्हाण, कृषी सहायक चंद्रकांत बनसोडे, राहुल सोयाम, उपसरपंच प्रेम चव्हाण, पोलीस पाटील राहुल महाजन, विजय चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.
कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:31 AM